News Flash

चंद्रपूर जिल्ह्य़ात ६ नद्यांना महापूर

गोसीखुर्द, अप्पर व लोअर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, इरई, उमा व झरपट नदीला आलेल्या महापुराचे पाणी जिल्ह्य़ातील शेकडो गावात, तसेच शहरातील ५०

| August 3, 2013 04:36 am

 धरणांचे पाणी सोडल्याने आपत्ती      *  हजार नागरिकांना हलविले हजारो नागरिक घरांच्या छपरावरच *     राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा      ३५ जणांचा चमू दाखल *    पूरग्रस्तांसाठी हेलिकॉप्टरही      केले तैना

गोसीखुर्द, अप्पर व लोअर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, इरई, उमा व झरपट नदीला आलेल्या महापुराचे पाणी जिल्ह्य़ातील शेकडो गावात, तसेच शहरातील ५० वस्त्यांमध्ये शिरल्याने हाहाकार माजला आहे. पूर परिस्थिती बघता जिल्हा व मनपा प्रशासनाने काल दुपारपासूनच बचाव मोहीम राबवून तीन हजार लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले आहे, तर हजारो लोक अजूनही घराच्या गच्चीवर अडकून पडले आहेत. दरम्यान, पुराचे पाणी वाढतच असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची ३५ जणांची चमू दाखल झाली असून हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या जिल्ह्य़ात व शहरात गेल्या पंधरवडय़ात तिसऱ्यांना पूर आलेला आहे. मुख्यमंत्री या शहरातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून जात नाही तोच अतिवृष्टीला सुरुवात झाली आणि सलग तीन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्य़ातील शेकडो गावे व शहरातील ५० वस्त्या पुराच्या पाण्याखाली आल्या आहेत. काल गुरुवारपासूनच शहरातील नदी काठावरील गावे व वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली. आज पावसाने उघडीप दिली असली तरी गोसीखुर्द धरणाचे ३३, तसेच अप्पर व लोअर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, उमा, इरई व झरपट या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. ते पाणी गावात व वस्त्यांमध्ये शिरल्याने महापुराची परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. काल मध्यरात्रीपासून तर परिस्थिती आणखीच बिकट झालेली असून पठाणपुरा, विठ्ठल मंदिर, गोपालपुरी, बालाजी वॉर्ड, बिनबा वॉर्ड, ठक्करनगर, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, महसूल कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, दाताळा, विश्वकर्मा कॉलनी, प्रज्ञा चौक, गुलमोहर कॉलनी, जीवनज्योती कॉलनी, आकाशवाणी, स्नेहनगर, हवेली गार्डन, वडगाव, मुस्तफा कॉलनी, दानव वाडी, अंचलेश्वर वॉर्ड, गौतमनगर, राजनगर, ओंकारनगर, गुरुमाऊली वॉर्ड, बगड खिडकी, टायर मोहल्ला, चहारे वाडी, भिवापूर, लालपेठ एरिया, मातंग मोहल्ला, निंबाळकर वाडी, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग वसाहत, स्वावलंबीनगर, संत गाडगेबाबानगर, ख्रिश्चन कॉलनी, महात्मा फुले चौक, प्राध्यापक कॉलनी, शिक्षक कॉलनी, चैत्रबन, कृष्णाबन, काजीपुरा, हनुमान खिडकी, किसान वसाहत, मिलिंदनगर, फुकट मोहल्ला, गावंडे मोहल्ला, आदिवासी वॉर्ड, प्रधान मोहल्ला, तसेच नदी काठावरच्या अनेक कॉलनी, मोहल्ला व प्रभागातील हजारो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. महापुरात अडकलेल्यांना घराबाहेर काढण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाचे ३६ पूर व बचाव पथक सक्रिय आहेत, तर शहरात चार बोटी तैनात करण्यात आल्या असून जिल्ह्य़ात विविध ठिकाणी ८ बोटी लावण्यात आलेल्या आहेत. या माध्यमातून ३ हजार लोकांना विविध ठिकाणाहून बाहेर काढून मनपा, तसेच विविध सभागृह, खासगी शाळांमध्ये सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे. यात विठ्ठल मंदिरात ४००, पद्मशाली सभागृह १००, लोकमान्य टिळक शाळा दादमहाल २०८, महात्मा ज्योतिबा फुले सभागृह १८०, किडवाई शाळा ४००, बंगाली कॅम्प प्राथमिक शाळा भंगाराम १००, सुतार समाजभवन ५६, नागाचार्य मंदिर १०६, गुरुमाऊली सभागृह ८९, महाकाली हॉल ३५, साई कॉन्व्हेंट ३५, महाकाली प्राथमिक शाळा १२०, अभ्यंकर शाळा १००, टागोर शाळा १०२, तसेच शहरातील इतर शाळा व सभागृहातही लोकांना ठेवण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रकाश बोखड व कनिष्ठ अभियंता मोरेश्वर वनकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
मनपाच्या वतीने दोन्ही वेळ फूड पॉके टस्, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सहा कनिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सहा पथके विविध प्रभागात सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल मंदिर व अंचलेश्वर मंदिर पूर्णत: पाण्यात बुडले, तर अनेक भागात पाणी वाढत असल्याने लोकांना बाहेर काढणे सुरूच आहे. हजारो लोक पुरात अडकून पडले असून अखेर घराच्या गच्चीवर त्यांनी मुक्काम ठोकला आहे. बिनबा गेटजवळची संरक्षण भिंत मुसळधार पावसात कोसळल्याने परिसरातील शेकडो घरात पाणी शिरले. पूरग्रस्त भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने सर्वत्र अंधार आहे. रामननगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजार समितीचा मुख्य बाजार पूर्णत: पाण्याखाली आला असल्याने आज शहराला भाजीपाल्याचा पुरवठा होऊ शकला नाही. पूर परिस्थितीमुळे शहरातील सर्व शाळांना सुटी देण्यात आली. महर्षी कॉन्व्हेंट तर सलग दहा दिवसांपासून पाण्यात आहे. बजाज पॉलिटेक्निक, चांदा पब्लिक, इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये पाणी शिरले आहे. १२० कोटी खर्चून बांधण्यात आलेले भूमिगत गटार योजनेचे सर्व स्युअरेज प्लान्ट पाण्यात अक्षरश: बुडाल्याने कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. या प्लान्टचे जनरेटर पुरात बुडाले आहे. दाताळा मार्गावरील जिजाऊ, प्रिन्स सेलिब्रेशन, कंवरलॉन, इरई व चंद्रलोक लॉन पाण्यात बुडाले आहेत. सध्याचा पूर बघितला तर २००६ची पुनरावृत्ती असल्याची प्रतिक्रिया पूरग्रस्त व्यक्त करत आहेत.
दरम्यान पूर वाढतच असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची ३५ जणांच्या चमूला पाचारण करण्यात आले आहे. सायंकाळी ही चमू येथे दाखल झाली असून पुरात अडकलेल्यांना बोटीतून बाहेर काढणे युद्धपातळीवर सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तर हेलिकॅाप्टरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्य़ातील राजुर, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यालाही पुराचा फटका बसला असून शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. वढा, धानोरा, पिपरी, बेलसनी, चांदूर या गावांना महापुराने चारही बाजूंनी घेरल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर तोहोगाव, घुग्घुस, वणी, वरोरा, मूलचा संपर्क तुटलेला आहे. हैदराबाद, राजुरा, अहेरी, सिरोंचा, यवतमाळ, वणी, घुग्घुस, वरोरा, पाटाळा, गडचिरोली, ब्रह्मपुरी मार्ग बंद असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. महसूल कॉलनीत पुराचे पाणी शिरल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयात कर्मचारीच न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील विविध बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालयेही ओस पडली होती. पुराचे पाणी घरात शिरल्याने महागडय़ा वस्तूंचे नुकसान झाले. हवेली गार्डन, रहमतनगर, मुस्तफा कॉलनी, राजनगर व परिसरात तर आठ ते दहा फुटापर्यंत पाणी असल्याने या भागात घरांचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे.

मृतदेहालाही पुराचा फटका
शहरातील शांतीधाम व पठाणपुरा स्मशानभूमी महापुराच्या विळख्यात आल्याने आज बिनबा गेटच्या रस्त्यावरच मृतदेहाला अग्नी देण्यात आला. मृतदेहालाही पुराचा फटका बसल्याने बिनबाच्या प्रवेशव्दारावरच ही व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2013 4:36 am

Web Title: chandrapur heavy rain again
टॅग : Chandrapur,Heavy Rain
Next Stories
1 अकोला जिल्ह्य़ात पूर्णेला पूर
2 आठ लाख हेक्टरमधील पिकांची पुरती विल्हेट
3 संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान
Just Now!
X