नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या प्रांगणात लग्न सोहळ्यावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीच्या रोशनाईत हलगर्जीपणामुळे एका बालकाचा चेहरा विद्रूप झाला आहे.  खांदेश्वर पोलिसांनी लग्न आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या जखमी बालक नवीन पनवेलमधील साईकेअर रुग्णालयात उपचार घेत आहे.
नवीन पनवेल येथे गुरुवारी रात्री सव्वादहा वाजता सीकेटी विद्यालयाच्या प्रांगणात ही घटना घडली. विशाल व रिचा यांचे शुभमंगल सुरू होते. ठाकूर व यादव परिवाराच्या मीलनात अनेक स्नेही जमले होते. लग्नसोहळ्यात नवरदेवाला व्यासपीठावर आणत असताना रिमोटने फुटणारे रोशनाई फटाके फोडण्यात आले. मात्र काही वेळात येथे नेहा नैवहरा ही महिला आपल्या दीड वर्षांच्या वीरेन या मुलाला कवटाळून रडत होत्या. वीरेनच्या जवळच फटाके फुटल्याने त्याचा संपूर्ण डावा चेहरा जळला होता. त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. वीरेनला तत्काळ जवळच्या डॉ. मोहिते यांच्या साई चाइल्डकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरुवारपासून वीरेनवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या वीरेनच्या डोळ्यांविषयी त्याचे पालक चिंतेत आहेत. वीरेनचे वडील डॉ. अमितकुमार हे दुबई येथे काम करीत होते. तातडीने डॉ. अमितकुमार रविवारी रात्री घरी आल्यानंतर पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. आर. थोरात यांनी याबाबत लग्नसमारंभ आयोजकांवर हलगर्जीपणाचा आरोप ठेवून जीवितेस धोका झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचे साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. या लग्नसोहळ्यासाठी आयोजकांनी पोलीस परवानगी घेतली होती का याबाबतही चौकशी सुरू आहे. हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये यासाठी घटना घडल्यापासून वीरेन कसा आहे याची साधी चौकशी करायला लग्न आयोजकांपैकी कोणीही गेले नाही. त्याउलट या घडलेल्या प्रकाराबाबत आमची काहीही तक्रार नसल्याची विनाहरकतीच्या पत्रावर सही करण्यासाठी नैवहार कुटुंबीयांवर दबाव टाकण्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक रुग्णालयात येत होता, असे नैवहार कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वीरेनचा चेहरा प्लॅस्टिक सर्जरी करून बरा होईल, मात्र त्याला अनेक महिने लागतील असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र हलगर्जीपणामुळे वीरेनवर ही वेळ आणली. त्यांच्यावर खांदेश्वर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  
उपाययोजना नव्हत्या
ठाकूर व यादव यांच्या लग्नामध्ये जेथे फटाके फोडले त्या वेळी कोणत्याही सूचना उभ्या असलेल्या मंडळींना दिल्या नव्हत्या. तसेच हे फटाके वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले स्नेही जेथे उभे होते तेथे फोडण्यात आले. विशेषत: रिमोटचे फटाके फोडताना रांगेत लावल्यानंतर इतरांना त्या ठिकाणपासून दूर ठेवण्यासाठी आयोजकांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या, असे या प्रकरणातील पीडित पालकांचे म्हणणे आहे.