रुग्णाच्या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपयश आल्यास आपण तो डॉक्टर बदलून इतर डॉक्टरांची वाट धरतो, अशीच शक्कल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी लढविली आहे. सिडको वसाहतींमधील कचरा समस्येचा कायमचा निपटारा करण्यासाठी सिडकोचे भाटिया यांनी आरोग्य विभागाकडून स्वच्छता विभाग काढून साफसफाई कामगारांसह हा प्रश्न अभियंता विभागाकडे सुपूर्द केला आहे. मात्र डॉक्टर बदलला तरीही कचऱ्याच्या आजारावर उपचार होताना दिसत नाही. दिवाळसणामध्ये सिडको वसाहतींमधील तुडुंब भरलेल्या कचराकुंडय़ा हे वसाहतींचे वास्तव आहे. विशेष म्हणजे या समस्येविषयीच्या तक्रारीसाठी नागरिकांनी अभियंत्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यास हे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांमध्ये सिडकोच्या कामकाजाविषयी रोष निर्माण होत आहे.
पनवेलमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली आणि खारघर या सिडको वसाहतींमध्ये कचरा न उचलला जाणे ही मुख्य समस्या आहे. सणकाळातील सफाई कामगारांच्या सुट्टीमुळे हा प्रश्न जटिल झाला आहे. याअगोदर वसाहतींमधील कचरा न उचलल्यास वसाहतीमधील नागरिक सिडकोच्या आरोग्य विभागामध्ये जाऊन तक्रार देत होते. त्यानंतर काही तासांनंतर सदरचा कचरा उचलण्याची उशिरा का होईना कारवाई सुरू होत असे. मात्र भाटिया यांच्या नवीन प्रयोगानंतर वसाहतींमधील कचरा समस्या सुटण्याऐवजी वाढली आहे. मिस्टर क्लीन यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दोषी ठरवत संबंधित वसाहतींच्या अधीक्षक अभियंत्यांच्या देखरेखीखाली कचरा उचलण्याची कंपनी आणली आहे. आरोग्य विभागाला डच्चू दिला; मात्र कचरा उचलण्याचे कंत्राट ज्या बीव्हीजी कंपनीला दिले आहे, त्या कंपनीवर भाटिया यांनी ठोस कारवाई केलेली नाही. बीव्हीजी या कंपनीच्या दिरंगाईमुळे वसाहतींमध्ये रोज कचरा साचला जात आहे. आरोग्य विभागाने बीव्हीजी कंपनीविरोधात आजपर्यंत ४० तक्रारी केल्या आहेत. तरीही सिडकोच्या उच्चपदस्थांकडून्न बीव्हीजीला अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे. पाच वसाहतींचा सुमारे अडीचशे टन कचरा उचलण्यासाठी बीव्हीजीचे १२ कॉम्पेक्टर व काही मजूर आहेत. याचसोबत सिडकोचे सुमारे १३०० मजूर सफाईचे काम करतात. तरीही कचऱ्यापासून सिडको वसाहती मुक्त होत नाहीत हेच कटू सत्य आहे. कळंबोली येथील समस्या कळविण्याकरिता सिडकोचे साहायक कार्यकारी अभियंता खान यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याच्या तक्रारी नागरिक करतात. अशी अवस्था सिडको वसाहतींच्या इतर अभियंत्यांची आहे. सिडकोच्या कामकाजाचा पुरावा देणारे हेच कडवट सत्य आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2014 रोजी प्रकाशित
सिडकोने डॉक्टर बदलूनही कचरा समस्या कायम
रुग्णाच्या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपयश आल्यास आपण तो डॉक्टर बदलून इतर डॉक्टरांची वाट धरतो, अशीच शक्कल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी लढविली आहे.
First published on: 24-10-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco colonies waste problem remain unsolved