कापसाच्या गाठी व सरकी मालमोटारीत चढउतार करण्याच्या दरात वाढ करण्याची हमालांची मागणी जिनिंग व प्रेसिंग चालकांकडून धुडकावण्यात आल्यामुळे हमाल व जिनिंग चालकांत तेढ निर्माण झाला आहे. या वादात मध्यस्थीचा प्रयत्न बाजार समितीकडून करण्यात आला, पण तो निष्फळ ठरला. त्यामुळे उद्यापासून (मंगळवार) कापूस खरेदी बंद राहणार असल्याचे बाजार समितीने पत्रकाद्वारे कळविले आहे.
कापूस गाठी व सरकी मालमोटारीत चढविण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केल्याने जिनिंग प्रेसिंगचा खर्च कमी झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनाही कापसावर ३० ते ४० रुपये क्विंटल अधिक दर देणे शक्य होईल, अशी मखलाशी परभणी जिनिंग-प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष पद्माकर कंदी, सचिव हरीष कत्रुवार, उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा, कोषाध्यक्ष विजय अग्रवाल आदींनी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांची भेट घेऊन केली.
कापूस गाठी, सरकी चढउतार करण्याचे दर वाढवून मिळावे, अशी हमालांची प्रमुख मागणी आहे. या दरवाढीसंदर्भात हमालांनी असहकार आंदोलन सुरू केले होते. बाजार समितीनेही दरवाढीबाबत हमालांची बाजू घेतल्याचे समजते. जिनिंग-प्रेसिंग चालक व हमालांत मध्यस्थी करून तडजोड घडवून आणण्याचा समितीने प्रयत्न केला. परंतु मार्ग निघू शकला नाही. परिणामी उद्यापासून समितीच्या वतीने सभापती संजय जाधव, उपसभापती आनंद भरोसे व सचिव सुरेश तळणीकर यांनी वृत्तपत्रातून जाहीर सूचना देऊन पुढील सूचना मिळेपर्यंत कापूस खरेदी बंद राहील, असे जाहीर केले.