निवडणुकीचे अर्ज भरण्यास दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शुक्रवार राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अतिशय वेगवान ठरला. वेळ कमी राहिल्याने उमेदवारी मिळालेल्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली, तर अद्याप उमेदवारी न मिळालेले प्रतिस्पध्र्याला तिकीट मिळाल्याचे कळताच आकांडतांडव करू लागले. काही ठिकाणी तर हातघाईवर पाळी आली.
भाजपने गुरुवारी साथ सोडताच शिवसेनेने शुक्रवारी सकाळपासून उमेदवारांना ‘मातोश्री’वर बोलावून एबी अर्ज देण्यास सुरुवात केली. अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक भगवा ध्वज फडकवत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने घोषणाबाजी करीत अर्ज भरण्यासाठी निघाले. त्याच वेळी शिवसेनेतील रुसवे-फुगवे उफाळून आले. गेली २५ वर्षे भाजपच्या उमेदवारासाठी राबणाऱ्या शिवसैनिकांना डावलून नवोदितास तिकीट दिल्यामुळे काही शाखांमध्ये नाराजीचा सूर उमटला. शिवसेनेच्या काही शाखांमध्ये सामूहिक राजीनामा नाटय़ही घडले. बंडोबा डोके वर काढू नयेत यासाठी शिवसेनेकडून काळजी घेण्यात येत होती. मात्र तरीही उमेदवारी न मिळालेले इच्छुक भाजपाकडून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त मुंबईत वाऱ्याच्या वेगाने पसरले होते. परिणामी शिवसेनेतील अस्वस्थता वाढत होती.
काँग्रेसमध्येही गुरुवारी मोठय़ा प्रमाणावर घडामोडी घडल्या. महायुती तुटल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन होऊन काँग्रेसचा विजय होईल अशी आशा बाळगून अनेक काँग्रेसजन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच काही इच्छुक भाजपा अथवा शिवसेनेची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु या दोन्ही पक्षांमध्येच इच्छुकांची संख्या मोठी असल्याने काँग्रेसजनांना प्रवेश द्यायचा की नाही असा प्रश्न शिवसेना आणि भाजप नेत्यांना पडला होता.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हातात कमी वेळ उरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धावपळ उडाली होती. मात्र वादग्रस्त मतदारसंघातील उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर करण्याची खेळी खेळत बंडोबांना थोपवून धरण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत उमेदवारी मिळाली तर ठिक अन्यथा शनिवारी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाडय़ात उडी घ्यायची असे मनसुबे रचून इच्छुक निवडणुकीच्या तयारीत गुंतले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी दुसऱ्या पक्षाचे दरवाजे ठोठावणाऱ्या इच्छुकांशी संपर्क साधून त्यांचे मन वणविण्याची जबाबदारी काही नेत्यांवर सोपविण्यात आली होती. परंतु इच्छुक मंडळी मोबाइल बंद करून बसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. परिणामी शुक्रवारी सर्वच पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली होती.