सायन-पनवेल महामार्गावरील नेरुळ एलपी उड्डाणपुलावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. गुजरात येथून सुती धाग्याचा माल घेऊन हा कंटेनर (एनएल-०१-बी-९६८९) जेएनपीटी बंदराच्या दिशेने येत होता. एलपी उड्डाणपुलावर कंटेनरच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. घटनेचे गांभीर्य ओळखत चालकाने कंटेनर जागीच थांबवला. मात्र तोपर्यंत इंजिनने आग पकडली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने नेरुळ अग्निशमन केंद्राला याची माहिती दिली. केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मोहिते यांनी दिली. शॉटसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 8:47 am