मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणेच ‘समान काम.. समान वेतन’ देण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव बुधवारच्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वर्षांला सुमारे ११ कोटी ३९ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. मध्यंतरी, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे ठाणेकरांना कचरा समस्येला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येते. यामुळे कंत्राटी कामगारांच्या पगारात सुमारे साडेचार हजारांची वाढ होणार असून कायम कामगारांप्रमाणे १५ हजारांचे मासिक वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होणार आहे.  
ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाखांच्या घरात असून शहरात दिवसाला ६५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. शहरातील कचरा संकलन आणि त्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे घंटागाडी, कॉम्पॅक्टर आणि रस्ते साफसफाई खासगी ठेकेदारामार्फत कंत्राट पद्धतीने करण्यात येते. या ठेकेदारांकडे कामगार महापालिकेतील कायम कर्मचाऱ्याप्रमाणेच काम करतात. मात्र, या दोघांच्या वेतनामध्ये सुमारे साडेचार हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळेच पालिकेच्या कायम कामगारांप्रमाणेच म्हणजेच ‘समान काम..समान वेतन’ मिळावे, या मागणीसाठी घंटागाडी आणि रस्ते सफाई कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. तसेच या आंदोलनानंतर आयुक्त असीम गुप्ता आणि कंत्राटी कामगारांमध्ये बैठक झाली होती. त्यामध्ये याविषयी चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, या संदर्भात कामगार नेते शरद राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने यासंबंधीचा ठराव येत्या २५ नोव्हेंबपर्यंत सर्वसाधारण सभेपुढे आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने ‘समान काम..समान वेतन’ चा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामुळे घनकचरा व्यवस्थान विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, शिक्षण मंडळ, मलनिस्सारण विभाग, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, ठाणे कलादालन, नाटय़गृह, नागरी संशोधन केंद्र, स्मशानभूमी, कोपरी येथील ल. फतीचंद प्रसूतीगृह, प्रसाधनगृह साफसफाई आदी विभागातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.