द्रोणागिरी नोडमधील सीडब्ल्यूसीच्या गोदामातील काम मागील ११ महिन्यांपासून बंद असून वेतन नसल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गुरुवारी कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर या संदर्भात सोमवारी दिल्लीत बैठक होत असून या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
सिडकोच्या द्रोणागिरी नोडमध्ये जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योगाच्या आयात-निर्यातीच्या मालाची ने-आण करण्यासाठी सीडब्ल्यूसीने गोदाम उभारले आहे. त्यास आज २२ वर्षे झाली आहे. गोदामातील काम कमी झाल्याने तसेच काम करण्यासाठी कंत्राटदार नसल्याने गोदाम गेल्या ११ महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे या गोदामात ३७३ प्रत्यक्ष तर त्यावर आधारित ४०० पेक्षा अधिक कामगारांवर वेतन नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गोदाम पूर्ववत सुरू करण्यासाठी कामगारांनी सीटूच्या रायगड श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेत सीडब्ल्यूसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी माजी आमदार विवेक पाटील, कामगार नेते भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे, सुधाकर पाटील तसेच आकाश भोईर व अरुण पाटील आदींच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या चर्चेत कामगारांना सहा वर्षांकरिता गोदाम सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात येईल. या संदर्भात सोमवारी दिल्लीत बैठक होणार असून त्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असे अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे शेकडो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष या दिल्लीतील बैठकीकडे लागले आहे.