राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती करणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे संच राज्यातच नाही तर देशातील संचांमध्ये मानाचे स्थान मिळवून असून ते तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती एकलहरे येथे झालेल्या संघर्ष समिती, विविध कामगार संघटना आणि कॉन्ट्रक्टर संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. वीज महाग पडत असल्यास ती का महाग पडते, त्याची कारणे शोधून या नवीन प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू करावे, कोणतीही संधी न देता एकतर्फी निर्णय घेतल्यास संघर्ष करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.
अध्यक्षस्थानी निवृत्ती चाफळकर होते. प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, सामनगावचे सरपंच विजय जगताप, सूर्यकांत पवार आदी उपस्थित होते. एकलहरे संच होणे ही उद्योग धंद्यासाठी महत्वाची बाब असून यावर हजारो कुटुंबियांच्या चुली अवलंबून आहेत. नवीन प्रकल्प सुरू न झाल्यास बेरोजगारी वाढून युवकांपुडे आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही.
प्रस्तावित प्रकल्पाबाबत धोरण ठरविताना शेतकऱ्यांना विचारात घेणे गरजेचे असून त्यांनाही समितीत स्थान मिळावे, अशी सूचना रामदास डुकरे यांनी केली. इंडिया बुल्सला वीज केंद्राचा रेल्वेमार्ग वापरण्यास दिला व वीज केंद्राच्या बंधाऱ्यातून पाणी दिले आहे. अमेरिकेतील जुने काही संच ६५ वर्षांपासून कार्यान्वित आहेत. तर, युनिट तीनला फक्त ३५ वर्ष झाले आहेत. या संचांचे नुतनीकरण केल्यास अजून १० ते १५ वर्ष ते सुरू राहू शकतील, असे मत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडले
अध्यक्षीय भाषणात चाफळकर यांनी येथे नवीन संच सुरू होण्यासाठी पाणी, रेल्वे, जागा उपलब्ध असून येथील वातावरणही  योग्य असल्याचा मुद्दा मांडला. नाशिकच्या डाव्या व उजव्या बाजूस गंगापूर, दारणा, मुकणे, भंडारदरा ही धरणे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा तुटवडा नसून असे आणखी काही प्रकल्प प्रशासनाने उभारले तरी वावगे ठरणार नाही. अलीकडेच ऊर्जामंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेची माहितीही त्यांनी दिली. ऊर्जामंत्र्यांनी नाशिकचा विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. १८ मे रोजी ऊर्जा मंत्री नाशिकला येत असून त्यावेळी प्रकल्प बचाव संघर्ष समिती आणि सर्व संघटनांच्या वतीने टप्पा दोन मधील संच बंद करून नव्या व प्रस्तावित प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यासंदर्भात एकत्रित निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी सरपंच मोहन निंबाळकर, हरिष सोनवणे, राजेंद्र लहामगे, दिलीप कोठुळे आदी उपस्थित होते.