हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सिलिंडरधारकांना अनुदानित दरात गॅस सिलिंडर पाहिजे असेल तर त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले पाहिजे. बँकेच्या त्या कागदपत्रांची प्रत विहित नमुन्यातील आधारकार्डासोबत पुरवठादार एजन्सीत जमा केली पाहिजे. अशा स्वरूपाचा फतवा हिंदूस्थान पेट्रोलियमच्या डोंबिवलीतील एजन्सींनी काढल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली आहे.
अनुदानित सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी कोणावरही आधारकार्डची सक्ती करता येणार नाही, असे न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालावरून स्पष्ट झाले आहे. तरीही ‘एचपी’कडून राष्ट्रीयकृत बँकेत खाते तसेच आधार कार्ड बंधनकारक केले जात असल्यामुळे ग्राहकांची अक्षरश: तारांबळ उडाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडले नाही. तसेच आधारकार्ड विहित नमुन्यातील अर्जाद्वारे गॅस एजन्सीत जमा केले नाही. तर आपणास गॅस सिलिंडर मिळणार नाही या भीतीने अनेक ग्राहक कार्यालयाला सुट्टी घेऊन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे, आधारकार्ड काढणे ही कामे रांगा लावून करीत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील अ‍ॅलर्ट गॅस एजन्सीत हा गोंधळ मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. अतिशय काळजीपूर्वक अर्ज भरल्यानंतरदेखील गॅस एजन्सीत ग्राहकाच्या अर्जात काही त्रुटी काढून त्यास परत पाठविण्याचे प्रकार वाढले आहेत. अर्ज स्वीकारण्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ एवढाच वेळ ठेवण्यात आला आहे. अनेक वेळा ११ वाजून गेले तरी कर्मचारी अर्ज स्वीकारण्यास उपस्थित नसतात, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडताना घरातील महिलेचे नाव अगोदर पाहिजे. पगाराचे, निवृत्ती वेतनाचे खाते अनुदानित सिलिंडरसाठी चालणार नाही, अशी जाचक नियमावली हिंदुस्थान पेट्रोलियमकडून तयार करून ग्राहकांच्या माथी मारल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत एजन्सीच्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले  की, ‘एचपी’ने फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले आधारकार्डचे अर्ज स्वीकारण्याचे सूचित केले आहे. आम्ही फक्त वितरक आहोत. त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही.