मतदारांशी समन्वय साधण्यासाठी राजकीय उमेदवारांमार्फत कार्यालयांबाहेर थाटल्या जाणाऱ्या मंडप उभारणीचे काम घेण्यास या वेळी ठेकेदार फारसे उत्सुक नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. निवडणुकीचा हंगाम म्हणजे मंडप ठेकेदारांची दिवाळी असल्यासारखे चित्र असते. प्रत्यक्षात मात्र राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मंडप उभारणीचे काम घेणे म्हणजे 憓आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या拀 असल्याच्या प्रतिक्रिया संबंधित ठेकेदारांकडून पुढे येत आहेत. मंडप उभारणीच्या कामाचे पैसे वसूल करण्यासाठी उमेदवारांकडे हेलपाटे घालावे लागतात आणि आपण ज्याचे काम घेतले तो उमेदवार पडेल ठरला तर वसुलीचे काम आणखी कठीण. त्यामुळे ही कामे नकोत रे बाबा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
मंडप उभारणीच्या कामासाठी ठेकेदार पैशांची गुंतवणूक करतात. मात्र, या कामाचे पैसे वसूल करण्यासाठी ठेकेदारांना उमेदवारांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी आता निवडणुकीच्या कामापासून चार हात लांब राहणेच पसंत केले आहे. प्रस्थापित राजकीय पुढारी ठरलेल्या ठेकेदारांमार्फत मंडप उभारणीची कामे करतात.  त्यामुळे या ठेकेदारांचा व्यवसाय निवडणूक हंगामात तेजीत असतो. या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांव्यतिरिक्त अनेक हौसे-गवशे-नवशे उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावीत असतात. या उमेदवारांमार्फत मतदारसंघात कार्यालये थाटली जातात आणि त्या कार्यालयांबाहेर मंडप उभारून विद्युत रोषणाई करण्यात येते. असे असले तरी निवडणुकीनंतर पैसे मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्याने ठेकेदार अशा उमेदवारांची कामे घेण्यास नकार देऊ लागले आहेत. त्यामुळे असे उमेदवार नवख्या ठेकेदारामार्फत मंडपाची कामे करून घेत असतात, अशी माहिती ठाण्यातील मंडप ठेकेदारांनी दिली.
पाच वर्षे कामाचे आश्वासन..
प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांचे ठेकेदार ठरलेले असल्याने त्यांची कामे इतरांना मिळत नाही. छोटा मंडप उभारायचा असेल तरी साधारणत: त्या कामासाठी तीन कामगार लागतात. या एका कामगाराची सुमारे सहाशे रुपयांची रोजंदारी ठरलेली असते. त्यांना रोख पैसे द्यावे लागतात. इतर कामांसाठीही पैसे खर्च करावे लागतात. या कामाचे पैसे लगेच मिळत नाहीत. त्यामुळे या कामासाठी ठेकेदाराला स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागतो. काही वेळेस पैसे वसूल करण्यासाठी उमेदवारांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या अनुभवामुळे अनेक ठेकेदार ही कामे घेत नाहीत. त्यामुळे असे उमेदवार मंडप व्यवसायातील नवीन ठेकेदाराला गाठतात आणि निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पुढील पाच वर्षे तुम्हालाच आम्ही काम देऊ, अशी आश्वासने देतात. त्यामुळे मंडप व्यवसायातील नवीन ठेकेदार मंडप उभारणीचे काम करण्यासाठी तयार होतात, अशी माहितीही मंडप ठेकेदारांनी दिली.  
सेंट्रल मैदानातील ठेकेदाराची 憓दिवाळी拀
ठाणे शहरातील सेंट्रल मैदानामध्ये निवडणुकीच्या प्रचाराकरिता सर्वच पक्षांतील बडय़ा नेत्यांच्या सभा होतात. या सभांच्या तारखा एकापाठोपाठ सलग असल्याने या मैदानातील व्यासपीठ उभारण्याचे काम एकाच ठेकेदाराला मिळते. पहिल्या दिवशी झालेल्या सभेचे व्यासपीठ काढून त्या ठिकाणी दुसरे व्यासपीठ उभारणे शक्य नसते. त्यामुळे नाइलाजास्तव सर्वच पक्ष त्याच व्यासपीठाचा सभांसाठी वापर करतात, असे चित्र यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिसले आहे. त्यामुळे निवडणूक काळात सेंट्रल मैदानातील मंडप उभारणीचे काम मिळणाऱ्या ठेकेदाराची एकप्रकारे लॉटरी लागते.