महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी डॉ. सुहास नवले हा विक्री कर निरीक्षक परिक्षेत राज्यात पहिला आला. मागील वर्षीही या परीक्षेत अनंत रामराजे भोसले या केंद्राच्याच विद्यार्थ्यांने राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता.
याशिवाय केंद्रातील भाऊसाहेब कैलास ढोले, डॉ. सचिन सरपले, नम्रता सोनवणे, मधू शिंदे, रुपाली वांद्रे व प्रकाश डोक्रस या ६ विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. यातील नवले, ढोले यांची अनुक्रमे मंत्रालयात व बांधकाम विभागात निवड झाली होती.
मनपाच्या या केंद्राच्या पदरात दरवर्षी चांगले यश पडत असून शहरातील असंख्य होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. केंद्र मार्गदर्शक प्रा. एन. बी. मिसाळ यांचे सुयोग्य मार्गदर्शन, मनपाने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधा व विद्यार्थ्यांचे कष्ट यामुळेच हे यश मिळाले आहे असे महापौर शीला शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सांगितले.
केंद्राच्या नव्या इमारतीची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यानंतर केंद्र अधिक सुसज्ज व अत्याधुनिक होईल. असे केंद्र असलेली नगर मनपा ही राज्यातील एकमेव मनपा आहे असे महापौर व आयुक्तांनी अभिमानाने सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, उपायुक्त डॉ. महेश झगडे, विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुद्धे, केंद्र समनव्यक सुनिता पारगावकर यांनी अभिनंदन केले आहे.