बालदिन साजरा करीत असताना बालकांना शिक्षण, पालन, पोषण, जडण-घडण या बाबी त्यांच्या वयोमानानुसार त्यांना मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे मत प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांनी व्यक्त केले. वाढलेले बालगुन्हे गुन्हे कमी करण्यासाठी बालकांशी संबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व बाल न्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणकर चौकातील बाल सुधारगृहात बालदिन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानाहून न्या. मोहोड बोलत होते. यावेळी सीबीआयचे न्यायाधीश एस.जी. मेहरे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर.एन. पांढरे, बालन्याय मंडळाचे प्रमुख न्यायाधीश एन.एन. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बालकांवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी ही त्यांच्या पालकांची आहे. चांगल्या संस्कारातून मुलांचे व्यक्तिमत्व घडते, असे न्या. एस.जी. मेहरे यांनी सांगितले. न्यायाधीश पांढरे यांनी ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा-२०१२’ यावर सविस्तर माहिती दिली. न्या. किशोर जयस्वाल यांनी हरविलेल्या मुलांविषयी, बाल कामगार, विशेष मुले आणि न्यायाधीन बंदी यांच्या पुनर्वसनाची गरज असल्याचे नमूद केले. न्या. एन.एन. जोशी यांनी बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बालक दिनानिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन न्यायदंडाधिकारी एस.व्ही. थोडगे यांनी तर बाल न्याय मंडळाचे सदस्य के.टी. मेले यांनी आभार मानले. कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष, बाल सुधार समितीचे सदस्य, संरक्षण अधिकारी, बाल सुधारगृहाचे अधीक्षक, विधि स्वयंसेवक उपस्थित होते.