कळंबोली हे बेकायदा फलकबाजांसाठी डेस्टिनेशन ठरले आहे. वाढदिवसापासून ते महोत्सवापर्यंत सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी येथे फलक झळकविले जातात. कोणीही या फलक लावून जा अशी येथील परिस्थिती आहे यामध्ये अभिनेता सलमान खानच्या शुभचिंतकांनी उडी घेतली आहे.
दोनच दिवसांवर सलमानचा वाढदिवस येऊन ठेपल्याने कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पादचारी पुलावर सलमानला शुभेच्छांचा फलक टांगला होता. सलमान आपला प्रत्येक वाढदिवस कुटुंबीय व  मित्रपरिवारासोबत पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवर साजरा करतो. तो घरी जाताना त्याला आपल्या चाहत्यांचे प्रेम दिसावे यासाठी हा टांगलेला फलक काही तासांत महामार्गावर कोसळला आणि एका अपघाताला निमंत्रण मिळाले.
सलमानच्या वाढदिवसाचा फलक तात्पुरता उभारला असल्याने तो कोसळण्यादरम्यान या फलकाखालून एका दुचाकीवरून पती, पत्नी व लहान मुलगा जात होते. सुदैवाने ते त्रिकूट या फलकाखाली आले नाही. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. मात्र इतर वाहनचालकांनी फलक पडलेला पाहून अनेकांनी वाहने थांबवून गर्दी केली. मात्र हा फलक अभिनेता सलमानचा असल्याचे समजल्यावर त्यांनी निमूटपणे फलक उचलून रस्त्याकडेला फेकून दिला आणि त्यानंतर ते निघून गेले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.  
कळंबोली वसाहतीमध्ये फलकबाजांनी आपसात स्पर्धा लावली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, हिंदुस्थान बँकेचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांची स्पर्धा लागल्याचे चित्र पाहायला मिळते. जानकरांच्या फलकाने कळंबोलीकरांच्या प्रवेशद्वारावर सिडकोने अवजड वाहनांच्या बंदीसाठी उभारलेल्या कमानीवर आपले स्थान निश्चित केले. तर हिंदुस्थान बँकेचे अध्यक्ष जगताप यांनी स्वत:च्या बँकेच्या इमारतीची एक बाजू पूर्णपणे झाकेल एवढा मोठा फलक येथे उभारून आपले माथाडींच्या मनातील स्थान दाखवून दिले. इच्छा नसताना कळंबोलीकरांना हे बेकायदा फलकबाजांचे चेहरे पाहावे लागतात. आगरी महोत्सवाचे सूप वाजून पंधरा दिवस झाले तरीही जानकरांच्या शेजारी तो फलक अजूनही कायम आहे. सिडकोचे या सर्व विद्रूपीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे.