योगासन, प्राणायाम आणि योगोपचाराचे गाढे अभ्यासक रामभाऊ छापरवाल हे कार्य मागील २५ वर्षांपासून अविरत करत आहेत. त्यांच्या पत्नी ताराबाई छापरवाल यांनी त्यांच्याकडून योगासन, प्राणायाम व योगोपचाराचे धडे घेऊन हे कार्य २२ वर्षांपासून आजपर्यंत जवळपास तीन हजार महिलांना व्याधीमुक्त केले आहे. ताराबाई छापरवाल यांच्या नि:स्वार्थ सेवेतून विदर्भ, मराठवाडय़ातील हजारो महिलांना योगोपचाराचे महत्त्व पटले आहे.
ताराबाई फक्त दहावी उत्तीर्ण आहेत. ताराबाई येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक कार्याबरोबरच बालसंस्कार शिबीर आणि महिलांना योगोपचाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक शिबिरे घेतली. महिलांना पाठीचे दुखणे, कमरेचे दुखणे, गुडघे दुखी, लठ्ठपणा, युवतीच्या विविध समस्या, प्रसूतीनंतरच्या महिलांच्या समस्या या व्याधींबाबत योगापचाराच्या माध्यमातून व्याधीमुक्त करण्यासाठी त्यांच्या वाशीमच्या गुरुवार बाजारातील निवासस्थानी दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत योगोपराचाचे नि:शुल्क धडे त्या देतात. यासोबतच  वाताचे विकार, दमा, अ‍ॅलर्जी, अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्ठ, अपचन, रक्तदाब या विकारांसह विविध शारीरिक विकार दूर करण्यासाठी ताराबाईंनी ही नि:स्वार्थ सेवा सुरू केली आहे. ताराबाईंना एक्स-रे रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट आणि आरोग्यशास्त्रासोबत त्यांना काही अडचण आल्यास पती रामभाऊ छापरवाल यांच्याकडून समजावून घेतात व महिला व युवतींना त्या मार्गदर्शन करतात. ताराबाईंनी आजपर्यंत वाशीम, मालेगाव, मंगरूळपीर, पुसद, शेंबाळपिंप्री, मराठवाडय़ातील शेलू, मानवत, कळमनुरी येथे योगोपचाराची अनेक शिबिरे घेतली. या माध्यमातून हजारो महिलांना योगाचे महत्त्व सांगितले आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेक महिलांना कमरेच्या व हाडाच्या शल्यचिकित्सा करण्याचे सुचविले होते. अशा शंभराहून अधिक महिलांना गेल्या पाच वर्षांत कोणतीही शल्यचिकित्सा करण्याची गरज पडली नसल्याचा दावाही ताराबाईंनी केला आहे. ताराबाईंच्या या नि:स्वार्थ सेवेबद्दल लॉयन्स क्लब, वाशीम, रोटरी क्लब, हरिभाऊ प्रतिष्ठान, वाशीम, माहेश्वरी मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे. ताराबाईंनी २००५ मध्ये योगगुरू रामदेवबाबा यांच्या हरिद्वार येथील आश्रमात योग प्रशिक्षण पूर्ण केले. त्या पतंजली योगपीठाच्या प्रशिक्षक म्हणून विविध ठिकाणी योग शिबिरे घेतात. भागवताचार्य किशोर व्यास यांनी ऋषीकेश येथील शिबिरातही महिलांना योग शिकविण्याचे कार्यही ताराबाईंनी केले आहे. रामभाऊ छापरवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून २८ डिसेंबर २०१२ रोजी वाशीममध्ये ओरिसाचे माजी मुख्य न्यायमूर्ती वल्लभदासजी मोहता यांच्या हस्ते मातोश्री नारायणीबाई योगासन, प्राणायाम व योगोपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या केंद्राच्या संचालिका म्हणून ताराबाई काम पाहतात. त्यांचे पती रामभाऊ छापरवाल व्यावसायिक असून तेही त्यांच्या जुन्या रिसोड नाक्यावरील त्यांच्या दुकानात दररोज रात्री ७ ते १० वाजेपर्यंत योगोपचाराचे नि:स्वार्थ कार्य करत आहेत. त्यांचे सुपुत्र अतुल छापरवाल सी.ए., एम.बी.ए. असून सध्या थायलंडच्या एका कंपनीत मुख्य वित्त अधिकारी आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ताराबाईंचा येथील ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल इंडिया (जेसीआय) तर्फे सामाजिक व इतर क्षेत्रात योगदानासाठी सत्कार करण्यात येणार आहे.