सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तरी महोत्सवानिमित्त विदर्भ साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘कवी आणि काव्य’ या विषयांतर्गत बालकवी आणि निसर्ग या विषयावर बालकवी वाङ्मयाचे अभ्यासक हर्षल मेश्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भंडारा शाखेच्या विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर गुप्ते होते.
हर्षल मेश्राम म्हणाले, बालकवींनी निसर्गविषयक कवितेत क्रांती केली. त्यांनी निसर्गाला आपल्यात सामावून घेतले. ते निसर्गाशी एकरूप झाले. त्यांच्या कवितेत नाद, माधुर्य व ध्वनी यांचा सुंदर समन्वय आहे. नादमधुर शब्दांनी ते आपल्या कल्पना सजवतात. स्फु रणातून त्यांची कविता प्रसवते. बालकवी निसर्गातील प्रत्येक गोष्टीवर मानवी भावभावनांचे आरोप करतात. फुलराणी, संध्या रजनी, बालविहंग, श्रावणमास, औदुंबर या त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अक्षरलेणी आहेत. त्यांच्या डोळ्यांना दिसलेल्या, मनाला भावलेल्या आणि अंतकरणाला जाणवलेल्या दृश्याशी ते एकजीव होतात.  प्रास्ताविक व संचालन विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रदीप गादेवार यांनी केले.