गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील दहावा लेख.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना म्हणजे केवळ तंटे मिटविण्याचे माध्यम नव्हे, तर ग्रामीण भागातील जनतेची मानसिकताही बदलविण्याचे ते प्रभावी साधन ठरल्याची बाब नंदुरबार जिल्ह्यात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधोरेखीत झाली आहे. एखाद्या मोहिमेस लोकसहभाग लाभल्यास अनेक महत्वपूर्ण बाबी दृष्टीपथास येऊ शकतात. आसपासच्या जिल्ह्यात जातीय दंगली घडल्यानंतर सातपुडय़ाच्या पर्वतराजीत त्याचे पडसाद उमटू न देण्याची घेण्यात आलेली खबरदारी, ही त्यापैकीच एक. सणोत्सव एकत्रिपणे साजरे करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देणे, गणेशोत्सवात ‘एक गांव एक गणपती’ संकल्पना १४८ गावांमध्ये प्रत्यक्षात आणणे, असे वेगवेगळे उपक्रम जातीय सलोखा राखून यशस्वी करण्यात आले आहेत.
गावातील तंटे सामोपचाराने स्थानिक पातळीवरून मिटवून विकासाला चालना देण्याचा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. एवढेच नव्हे तर, गावात भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत, अशा वातावरण निर्मितीवर भर दिला जातो. या संपूर्ण कामाची जबाबदारी असते ती, प्रत्येक गावात स्थापन झालेल्या तंटामुक्त गाव समितीवर. प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून गावात धार्मिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सार्वजनिक सणोत्सव शांततेने साजरा करणे, धार्मिक व जातीय सलोखा निर्माण करणे, राजकीय सामंजस्य निर्माण करणे, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आदी विषयांवर या समित्या सक्रियपणे कार्यरत असतात. नंदुरबार जिल्ह्यातील ५०१ गावांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला असून या प्रत्येक गावात तितक्याच म्हणजे ५०१ तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या आणि पोलीस दलाने या योजनेसाठी केलेल्या कामाची प्रचिती बिकट प्रसंगात लक्षात येते. वर्षभराच्या काळात धुळे व जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जातीय दंगलींना सामोरे जावे लागले. हे दोन्ही जिल्हे तसे नंदुरबारला लागून. तेथील जातीय दंगलीचे पडसाद मात्र नंदुरबारमध्ये उमटले नाहीत, याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाने लक्ष वेधले. त्याचे संपूर्ण श्रेय पोलीस यंत्रणेने समित्यांना दिले आहे. धार्मिक व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी समित्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आसपासच्या दंगलींचे गंभीर पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटले नाहीत, असे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे.
तंटामुक्त गाव योजनेत लोकसहभाग वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आले. ईद ए मिलाद आणि दसरा मेळावा या माध्यमातून हिंदु-मुस्लिम बांधवांना एकत्र आणून त्यांच्यात धार्मिक सलोखा वृद्घिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांचा सहभाग मिळविण्यात नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी यश प्राप्त झाले. तंटामुक्त गाव समिती, पोलीस विभाग व महसूल विभाग अशा सर्वानी एकत्रितपणे काम करून ‘एक गांव एक गणपती’ ही संकल्पना १४८ गावांमध्ये यशस्वी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणूक काळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या गाव पातळीवरील सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कोणत्याही गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे अधीक्षक कार्यालयाने नमूद केले आहे. लोकसहभागातून काय घडू शकते, त्याची ही काही प्रातिनिधीक उदाहरणे.
 

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका