केवळ आठ-नऊ खासदारांच्या जोरावर शरद पवार पंतप्रधान कसे होणार, असा प्रश्न करत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता अजिबात नसल्याची टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात कुठेही लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले.    शरद पवार यांच्या राजकारणाविषयी मुंडे म्हणाले, संसदेत कोणालाही बहुमत मिळू नये असे पवारांना वाटते. पंतप्रधान होण्याचे स्वप्न ते नेहमीच पाहात असतात. त्यासाठी ते याला खेळव, त्याला खेळव असे दरवेळी करत राहतात. नवी दिल्लीला जाण्यापूर्वी मलाही पवारांची ताकद राजधानीत मोठी आहे, असे वाटत होते. परंतु दिल्लीतील राजकारणात शरद पवार हे बिगझिरो आहेत. पण आठ-नऊ खासदारांच्या बळावर पंतप्रधान होणे शक्य नाही. त्याहीपेक्षा अधिक संख्याबळ असलेले केंद्रात नऊ ते दहा पक्ष अस्तित्वात आहेत. या पातळीवर विचार केला तर पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न साकार होईल, असे मला वाटत नाही.     
लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ाबाबत शरद पवार पक्षातच भेदभाव करीत आहेत, असा उल्लेख करून मुंडे म्हणाले, लोकसभेसाठी आर. आर. पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील,जयंत पाटील अशांना उतरविण्याच्या विचारात शरद पवार आहेत. इतरांना लोकसभेच्या आखाडय़ात उतरविण्यापूर्वी पवारांनी आपले पुतणे अजित पवार यांना माढा, बीड वा राज्यात कुठेही उभे करून दाखवावे यामुळे पवारांची ‘बोले तैसा चाले’ ही प्रतिमा कायम राहील.    
शासनाने शेतकऱ्यांची डोकी फोडून ऊस दराचा प्रश्न सोडवू नये. अन्यथा इतर राजकीय पक्ष तुमच्या डोक्यावर बसतील असा इशारा देऊन मुंडे यांनी ऊसदर प्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांनाच लक्ष केले. ते म्हणाले, भांडवलदारांना नफा मिळवून देण्याचे धोरण शरद पवार यांनी राबविले आहे. त्यामुळेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊसदरासाठी रस्त्यावर उतरला आहे. हा प्रश्न शासनानेच निर्माण केला आहे. आघाडी शासनाने याबाबत योग्य धोरण राबविले असते तर शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करावे, साखर आयात करात सुधारणा करावी, साखर निर्यात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान द्यावे अशा स्वरूपाच्या उपाययोजना त्यांनी सुचविल्या.     
राज्यातील वीज दरवाढी प्रश्नी मुंडे म्हणाले, राज्य शासनाने असह्य़ वीज दरवाढ केल्याने नोव्हेंबर महिन्याच्या घरगुती, कृषी, व्यापारी वीज दरात प्रचंड वाढ होणार आहे. ही वीज दरवाढ राज्याला अधोगतीकडे नेणारी आहे. राज्यातील उद्योग वीज दरवाढीच्या धक्क्य़ामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे विजेचे दर प्रचंड चढे असल्याने राज्यातील उद्योजकांनी अन्य राज्यात स्थलांतर करण्याची धमकी दिली आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करून दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा राज्यातील महायुती रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या इशारा मुंडे यांनी दिला.