मुंबई-आग्रा महामार्ग आणि घोटी-सिन्नर रस्त्याने महिन्यापासून वाळूची अवैध वाहतूक होत असून वाळू चोरी रोखण्यासाठी घोटी पोलिसांनी उपाय योजले असले तरी चोरीच्या वाळुची वाहतूक सर्रासपणे सुरूच असल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयीच संशय व्यक्त करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून वाळू वाहतूक होत असताना महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घोटी टोल नाक्यावर पथकाकडून होणारी तपासणी बंद करण्यात आल्यानेही वाळू चोरीला वाव मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यासह मुंबई आणि उपनगरात बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूची घोटी-सिन्नर आणि मुंबई ग्रा महामार्गाने सर्रासपणे अवैध वाहतूक होत आहे. शासनाचा कमी टनाचा परवाना असताना जादा टनाची वाहतूक होत आहे.
जिल्ह्य़ातील मालेगाव, वैजापूर, कोपरगाव आदी भागातून ही वाळू वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत
आहे.
या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असले तरी महसूल विभागाने वाळू चोरीकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. वाळू चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इगतपुरी महसूल विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी घोटी टोल नाक्यावर तपासणी केंद्र सुरू केले होते. त्यामुळे शासनाच्या महसुलातही वाढ होत होती. मात्र महसूल विभागाने हा तपासणी नाका वर्षांपासून बंद केल्याने वाळू चोरांना फावले आहे.
दरम्यान, वाळूची चोरटी वाहतूक रोखण्याचे अधिकार पोलिसांना दिल्यानंतर घोटी पोलिसांमधील काही जण सोयीसोयीनुसार कारवाई करत आहेत. त्यांच्यातच असलेल्या अंतर्गत संघर्षांचा परिणाम वाळू चोरी रोखण्यावरही होत आहे.