हुंडय़ासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तुळशीराम महाराज काकडे, आशा काकडे व ज्ञानेश्वर काकडे (सर्व पैठण) अशी आरोपींची नावे आहेत. ठरलेल्या पाच लाख रुपये हुंडय़ापैकी तीन लाख न दिल्याने मुक्ताबाई काकडे या विवाहितेचा तिचा पती, सासरा व सासू यांनी गळा आवळून खून केल्याप्रकरणी जन्मठेप व वेगवेगळय़ा कलमान्वये १ लाख २० हजार रुपये दंड ही शिक्षा न्या. एस. एस. सावंत यांनी सुनावली. या घटनेची माहिती अशी, पैठणचा ज्ञानेश्वर काकडे व मुक्ताबाई यांचा विवाह १३ फेब्रुवारी २००९ रोजी झाला. विवाहात पाच लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. पैकी दोन लाख आधी देण्यात आले. विवाहानंतर हुंडय़ाचे तीन लाख दिले नाहीत, म्हणून मुक्ताबाईला त्रास देणे सुरू झाले. २७ एप्रिल २०१० रोजी मुक्ताबाई घरात पडली, असे सांगून तिच्या वडिलांना बोलाविण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत मुक्ताला घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यात तिचा मृत्यू झाला. मुक्ताबाईचे वडील रमेश लांडे (उचेगाव, तालुका पैठण) यांनी पैठण पोलिसात फिर्याद दिली. घाटी रुग्णालयातील तपासणीत मुक्ताबाईचा गळा आवळून खून झाल्याचा अहवाल न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करण्यात आला. या प्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अहवाल व परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.