रेल्वे कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली नोंदवण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गावरील विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र, असे असले तरी रेल्वेरुळ ओलांडणे, महिलांच्या डब्यातून प्रवास करणे, कारणाशिवाय साखळी खेचणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांत अशा गुन्ह्यांखाली अटक झालेल्यांकडून ४६ लाख ६ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गावरील गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम रेल्वे सुरक्षा दल करत असते. या दलातर्फे वर्षभर विविध स्थानकांवर कारवाई केली जाते. या मोहिमांमध्ये रेल्वेच्या कायद्याचा भंग करणाऱ्या प्रवाशांना पकडून दंड ठोठावला जातो. दंड भरण्यास असमर्थता दाखवणाऱ्यांना अटकही केली जाते. यंदा एप्रिल महिन्यापर्यंत रेल्वे कायद्याचा भंग करणाऱ्या २१२६४ जणांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात ही संख्या २१७२७ एवढी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अटक करण्यात आलेल्यांची संख्या कमी असली, तरी यंदा गंभीर गुन्ह्यांखाली अटक झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. यंदा एप्रिल महिन्यापर्यंत विनाकारण साखळी खेचणाऱ्या १४५ जणांकडून ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या १२३१ पुरुषांकडून २ लाख ४१ हजार रुपये वसूल केले. टपावरून प्रवास करणाऱ्या १२०९ प्रवाशांकडून १,७५,८५० रुपये दंडापोटी घेण्यात आले. तर रेल्वेमार्गात अडथळे निर्माण करून रेल्वेसेवा बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७२ जणांना पकडण्यात आले.