पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये वारंवार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची हमी दिली आहे. रेल्वे मंत्रालयानेही पंतप्रधानांची ही आज्ञावजा इच्छा शिरसावंद्य मानून आपल्या विभागीय मुख्यालयांना सूचना दिल्या आहेत. तरीही विभागीय मुख्यालयांना याबाबत जाग आल्याचे दिसत नाही. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही देणाऱ्या पश्चिम रेल्वेचा हा उघडा कारभार प्रवाशांच्या जिवाशी मात्र खेळच ठरू शकतो. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाडीत असलेल्या या मोटरच्या दरवाजावर तशा सूचनाही आहेत. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत १३११ या क्रमांकावर संपर्क साधा, असा फलकही आहे. मात्र डोळे बंद असतील, तर अशी उघडी संकटे दिसणार कोणाला?.. मग प्रवाशांनीच अशा धोक्यापासून लांब राहून आपली काळजी घ्यावी, हेच बरे!
रविवारी किंवा सुटीच्या दिवशी कमी गर्दीच्या वेळी अशी काळजी घेणे प्रवाशांना एक वेळ शक्य होईल.. पण कामाच्या दिवशी ऐन गर्दीत ठरवूनही या धोक्यापासून दूर राहणे अशक्य! रविवारी दुपारी बोरिवली ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या या गाडीच्या मोटरमनला काही जागरूक प्रवाशांनी या धोक्याची माहिती दिली असता, ‘आम्ही तरी काय करणार. तुम्ही लेखी तक्रार करा’ असा हतबल सूर त्याने लावला.
दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘माझे काय जाते, मी काय करू’ या वृत्तीवर असूड ओढत सरकारी कर्मचाऱ्यांना ही वृत्ती सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र रेल्वेतील ‘बाबूं’च्या अंगी अजूनही ही लिखापढीची संस्कृती भिनलेली आहे, याचे हे नमुनेदार उदाहरण! आता असे धोके दिसले, तर लेखी तक्रार केल्याशिवाय ते दूर होणार नाहीत, हे रेल्वे प्रवाशांनी लक्षात घ्यायला हवे.