News Flash

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आठमाही महसुली उत्पन्न निम्म्यावरच

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असताना पालिकेचे महसुली उत्पन्नाचे आकडे मात्र अद्याप निम्म्यावरच घुटमळत आहेत.

| January 13, 2015 09:23 am

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असताना पालिकेचे महसुली उत्पन्नाचे आकडे मात्र अद्याप निम्म्यावरच घुटमळत आहेत. यावर्षीही पालिकेच्या महसुली उत्पन्नात सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता पालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गेल्या वर्षी पालिकेचे मार्च ते डिसेंबपर्यंतचे आठमाही महसुली उत्पन्न २७३ कोटी रुपये होते. यावर्षी हे उत्पन्न २४९ कोटी म्हणजे २४ कोटी रुपयाने कमी जमा झाले आहे. महसुली उत्पन्नाचे आकडे फुगवून सांगायचे ही अधिकाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची रीत आहे. यावेळीही अधिकारी वस्तुस्थितीदर्शक महसुली उत्पन्नाचे आकडे न सांगता, उत्पन्नाचे फुगवून आकडे सांगत आहेत. करदात्यांकडून मोठय़ा रकमेचे धनादेश घ्यायचे. जमा केलेल्या धनादेशांपेकी अधिक धनादेश करदात्याच्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने परत जातात. मात्र, जमा धनादेश महसुली उत्पन्नात धरले जात असल्याने फुगीर आकडय़ांचा अधिकाऱ्यांचा खेळ उघडा पडतो. ३१ मार्च संपल्यानंतर परत गेलेल्या धनादेशांचा पुढील वर्षांत विचार केला जातो, असे कर विभागातील अधिकाऱ्यांकडून समजते.
मार्च ते डिसेंबर या आठमाही आर्थिक वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था करातून (एलबीटी) १२५ कोटी ३० लाख रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता करातून ७७ कोटी ९७ लाख, पाणीपट्टी २४ कोटी, नगररचना ३६ कोटी रुपये जमा झाले आहेत. एल.बी.टी.चे पालिकेचे एकूण लक्ष्य २७१ कोटी, मालमत्ता कराचे २०२ कोटी, पाणीपट्टी ८२ कोटी, नगररचना १६० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष एलबीटी कराची वसुली आणि शासनाकडून सदनिका नोंदणीतून मिळणारी रक्कम यांची बेरीज करून एलबीटीचे आकडे अधिकाऱ्यांकडून फुगवले जातात. प्रत्यक्षात एलबीटीची वसुली दरमहा सुमारे ९ ते १० कोटी रुपये असते. मालमत्ता कराची यावर्षी दरमहा वसुली सुमारे ९ कोटी रुपये झाली आहे. नगररचना विभागाने दरमहा ४ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागाने दरमहा ३ कोटी रुपये महसुली वसुली केली आहे. उत्पन्नाचे हे आकडे पाहता येत्या दोन महिन्यांत या चार महसुली विभागांनी कर वसुलीचे हेच आकडे कायम ठेवले तर चालू वर्षी पालिकेला सुमारे साडेतीनशे ते साडेचारशे रुपये महसूल मिळेल. पालिकेला या स्त्रोतांमधून एकूण ७१५ कोटी महसूल मिळणे आवश्यक आहे. फेब्रुवारी आला की कर वसुलीच्या नाटकी मोहिमा आणि मार्च संपला की पुढचे नऊ ते दहा महिने पुन्हा आराम अशा पद्धतीने प्रत्येक कर विभागातील कामकाज चालत असल्याने महसुली उत्पन्नात पालिकेला नेहमीप्रमाणे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची घट येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते. गेल्या वर्षी महसुली उत्पन्नात सुमारे १७० कोटींची घट आली होती. एलबीटी वसुलीत गेल्या वर्षी पालिकेला सुमारे ४० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.  यावर्षीही विकासक पालिकेला किती सहकार्य करतात त्यावर मालमत्ता विभागाची लक्ष्यपूर्ती अवलंबून आहे. पाणीपुरवठा विभाग नागरिकांना पाणी देयक पाठवत नसल्याने नेहमीप्रमाणे या वर्षीही पाणी देयकात निम्म्याने वसूल होणार असल्याचे दिसते.
विविध प्रकल्पांसाठी पालिकेने तीनशे ते चारशे कोटीचे कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचे यापूर्वीचे व सध्याचे हप्ते सुमारे २५ ते ३० कोटींपर्यंत पोहचले आहेत.  कर्जाऊ रकमा, हप्ते वाढत आहेत. नऊ महिन्यांनी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाकडून नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाहीतर; पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त आणि नगरसेवकांमधील वाद अटळ असल्याचे बोलले जाते.
कर विभागातील अधिकारी मात्र आमचे महसुली उत्पन्नाचे लक्ष्य आम्ही निर्धारित वेळेत पूर्ण करू. कर वसुलीसाठी कर्मचारी कामाला लागला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 9:23 am

Web Title: kalyan dombivali corporation income
टॅग : Loksatta,News,Thane
Next Stories
1 इ गव्हर्नन्सच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर नियंत्रण शक्य -सुरेश प्रभू
2 जॉनी लिव्हरची गंभीर ‘गांधीगिरी’
3 स्त्रियांना स्वावलंबनाबरोबरच आर्थिक समानताही हवी – डॉ. स्नेहलता देशमुख
Just Now!
X