लोकसभा निवडणुकीनंतर विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, रिपब्लिकन, आम आदमी पक्षातील उमेदवारांचा झालेला दारुण पराभव बघता आता पक्ष संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर स्थानिक पक्ष नेतृत्वामध्ये बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी जयप्रकाश गुप्ता यांची उचलबांगडी करीत विलास मुत्तेमवार यांचे खंदे समर्थक विकास ठाकरे यांची शहर अध्यक्षपदी निवड केल्याने गुप्ता समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा जणू ससेमिरा लावला होता. अनेक पदाधिकाऱ्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांंना विश्वासात घेऊन कामाला लावले होते. मात्र, त्यात यश आले नाही. काही कार्यकर्त्यांंची मुत्तेमवार यांच्यावर असलेली नाराजी प्रचाराच्या वेळी दिसून आली.
ग्रामीणमध्ये हीच परिस्थिती असून त्या ठिकाणी अनेक कार्यकत्यार्ंमध्ये जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांच्या विरोधात नाराजी होती. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा झालेला पराभव बघता शहर आणि जिल्हा अध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारीत आपल्या पदाचे राजीनामे दिले असले तरी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अद्याप राजीनामे स्वीकारले नाही. मात्र, शहर आणि ग्रामीणच्या काही पदाधिकाऱ्यांनी दोन्ही अध्यक्ष हटावची भूमिका घेतली असून त्यादृष्टीने वरिष्ठांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुका बघता काँग्रेसने झालेल्या पराभवावर चिंतन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. नागपूर जिल्ह्य़ाची येत्या २६ मे रोजी बैठक होणार असून त्यात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षाकडे गाऱ्हाणी मांडणार आहे. विकास ठाकरे आणि सुनीता गावंडे यांनी शहर आणि जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी इच्छुकांची संख्या बरीच असली तरी प्रदेश काँग्रेस कमिटी कोणाची निवड करते की आहे त्या दोघांना कायम ठेवते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या विरोधात नाराजी आहे. निवडणुकीपूर्वी ती नाराजी काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे बोलून दाखविली होती आणि त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीत दिसून आला. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षात राहून कोणाला मदत केली हे सर्वश्रृत आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक नेतृत्व बदल झाले तर फार काही नवल वाटू नये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुका बघता लवकरच निवडणुकीच्या संदर्भात विचार मंथन बैठक होणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढू नये, अशी भूमिका काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली असून त्या संदर्भात ते ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस फार वाढू शकली नाही. मुकुल वासनिक यांच्या प्रचाराच्यावेळी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना काढता पाय घेतल्याची चर्चा होती. या सर्व पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षामध्ये विविध जिल्ह्य़ात नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहे. बहुजन समाज पक्षाचा विदर्भात दारुण पराभव झाला असून अनेक उमेदवारांची जमानत जप्त झाली. बसपाचे स्थानिक नेतृत्व कमकुवत झाले आहे त्यात फेरबदल होण्याचे संकेत आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मायावती यांनी प्रदेश आणि जिल्हा पातळीवर सर्व कमिटय़ा बरखास्त केल्या आहेत.
विदर्भ आणि मराठवाडय़ातील झालेली पीछेहाट बघता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांच्याकडे विदर्भासह मराठवाडा, नगर, जळगाव, धुळे नंदूरबार या भागातील १४४ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक नेतृत्वामध्ये बदल होतील, असे संकेत बसपाच्या नेत्यांनी दिले आहे. भाजप आणि शिवसेनेला मिळालेले यश बघता भाजपमध्ये स्थानिक नेतृत्व बदलाचे वारे नसले तरी शिवसेनेमध्ये शहर आणि जिल्ह्य़ातील  कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
RSS claims of support to Congress in Lok Sabha elections
‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…
left alliance win jnu students union elections
अन्वयार्थ : भाजपविरोधी ऐक्याचा ‘जेएनयू’तील धडा