पुढच्या वर्षी लवकर या, असे बाप्पांना केलेले आर्जव, उत्साही मिरवणुका, नवतंत्रज्ञानाचा आविष्कार घडविणारे सादरीकरण, सजीव देखाव्यांद्वारे केले जाणारे प्रबोधन, पारंपरिक वाद्यांचा मेळ असा व्यामिश्र अनुभव देणारी गणरायाची विसर्जन मिरवणूक करवीर नगरीत तब्बल ३२ तास चालली. पोलीस प्रशासनाने डॉल्बीबाबत कडक धोरण अवलंबूनही मिरवणुकीची गती संथ राहिली होती. पंचगंगा घाटावर गुरूवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ५५३ मूर्तीचे विसर्जन झाले, तर ३५ मूर्ती दान करण्यात आल्या. २१ फुटी गणेशमूर्तीचे विसर्जन इराणी खाणीमध्ये करण्यात आले.     
णरायाच्या विसर्जन मिरवणुकीला बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मिरजकर तिकटीपासून सुरूवात झाली. मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींचे पूजन गृहराज्यमंत्री सतेज पाटील व महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्याहस्ते झाले. जिल्हाधिकारी राजाराम माने, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर यांच्यासह अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. दुपारनंतर अनेक मंडळांनी मिरवणुकीच्या आठ मार्गावरून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ केला. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यावरण विषयाचे संदेश देणारे देखावा सादर करण्यात आले होते. पंचगंगा नदी, रंकाळा तलाव यांचे प्रदूषण, स्त्रीभ्रूण हत्या,कोल्हापुरातील खंडपीठाची मागणी, रक्तदान, वृक्षारोपण या विषयांचे देखावे मंडळांनी सादर केले होते. डॉ.नरेंद्र दाभोलकर व शहीद कुंडलिक माने यांना श्रध्दांजली वाहणारे फलक मंडळांनी लावले होते. बहुतांश मंडळांचे कार्यकर्ते पारंपरिक वेशात आले होते. पुरूषांच्या बरोबरीने महिलांनी कोल्हापुरी फेटे बांधले होते. महिलांचा झिम्मा-फुगडय़ांचा खेळ भर पावसातही फुलला होता.    
विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्यासाठी मोठय़ा संख्येने कक्ष उभारण्यात आले होते. मिरजकर तिकटी येथे पोलीस प्रशासन व जीवरक्षक संघटना, गंगावेश ते पापाची तिकटी रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व हसन मुश्रीफ फौंडेशन, महापलिका, आमदार राजेश क्षीरसागर, भाजपा, जनसुराज्य शक्ती पक्ष, रामभाऊ चव्हाण परिवार यांच्यावतीने उभारलेल्या मंडपात मंडळांच्या अध्यक्षांना शाल व मानाचा श्रीफळ दिला जात होता. तर, महापालिकेने पर्यावरण वाचवा, हा संदेश देत प्रत्येक मंडळास रोपे वाटली होती.मिरवणूक मार्गावर सुका मेवा, सरबत, पाणी यांचेही वाटप केले जात होते. डॉल्बी लावण्याचा मुद्दा यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत वादग्रस्त ठरला. डॉल्बी लावून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना पोलिसांनी सुरूवातीपासूनच मज्जाव केला. त्यातून मंडळांचे कार्यकर्ते व पोलिसांचे खटके उडत होते. अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही निर्माण झाले. परिणामी यंदा डॉल्बी वाजण्याचे प्रमाण कमी होते.आकर्षक रेसर लाईट इफेक्ट, नेत्रदीपक रोषणाई हे यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. पंचगंगा नदी,राजाराम बंधारा, इराणी खाण येथे श्री च्या विसर्जनाची सोय करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी घातपाताचा प्रकार घडू नये यासाठी प्रखर दिव्यांची सोय करण्यात आली होती. जीवरक्षक दल, ग्नीशमन दल हे डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. शहरातील मिरजकर तिकटी मार्गावरील मिरवणुका डॉल्बीच्या मुद्यावरून कांही तास थांबल्या होत्या. महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिर येथे मंगळवार पेठ येथील मंडळे येत असल्याने आणि ताराबाई रोडवरील कांही मंडळे मिरवणूक मार्गावर येत असल्याने मिरवणुका बऱ्याच काळ खोळंबल्या होत्या. मिरजकर तिकटी येथे तर मिरवणुका आठ तासापर्यंत लांबल्या होत्या. तथापि सायंकाळी लेसर लाईट इफेक्टचा नयनरम्य कार्यक्रम पाहण्यास मिळाल्याने मिरवणुका खोळंबल्याचे फारसे जाणवले नाही. अखंड रात्रभर रस्त्यांवर भाविकांची गर्दी कायम होती. त्याचा प्रत्यय आज दुपारपर्यंत येत राहिला.
तलावात एक जण बुडाला
राजाराम तलावात श्री मूर्ती विसर्जन करतांना नंदू मछले (वय ३०) हा युवक बुडाला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचे शव विच्छेदनासाठी सीपीआर इस्पितळामध्ये नेण्यात आल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली.