वृद्धांनाही घडतो विहिरीचा ‘प्रवास’
पाण्यासाठीची जिवावर बेतणारी लढाई हे चित्र सध्याच्या परिस्थितीत चांगलेच अस्वस्थ करून टाकत आहे. हवालदिल झालेले डोळे, थरथरत्या हातात पाण्याचा हंडा, ६० फूट खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी चाललेली जीवघेणी कसरत.. उस्मानाबाद तालुक्यातील पिंप्री गावातील हे वास्तव. दोन हजार लोकवस्तीच्या या गावासाठी ६० फूट खोल विहिरीत उतरून पाण्यासाठी जीव टांगणीला लावणे जणू रोजचेच झाले आहे. एक-दोघे नव्हे तर आठ-दहाजण पाय घसरून विहिरीत पडले आहेत. काहीजण पाण्यासाठी कायमचे जायबंदी झाले आहेत.
वामन बिडबाग (वय ८०) डोळ्यात प्राण गोळा करून गावचा पूर्वेतिहास सांगतात. ‘लय उन्हाळे जगलोय. असा दुष्काळ केव्हाच नव्हता’. सुरकुतलेल्या कपाळावरच्या आठय़ा अजून गडद होतात. आठ दशकांचा अनुभव गाठिशी असणारे गावातील बुजुर्ग बिडबाग दररोज पाण्यासाठी विहिरीवर जातात. घरातली माणसे मोलमजुरीला गेल्यानंतर पाणी आणण्यास अन्य कोणताच पर्याय नाही. युती सरकारच्या काळात वलगुड तलावातून चिलवडी, सुर्डी, राघुची वाडी व पिंप्री या ४ गावांसाठी पाणीयोजनेचे काम झाले. कामाची चाचणी घेताना एकदाच पाणी आले. त्यानंतर बांधलेल्या टाक्यांमधून एक थेंबदेखील पाणी गावाला मिळाले नसल्याची खंत सरपंच मारुती बिडबाग यांनी व्यक्त केली.
पाणीप्रश्न पिंप्रीवासीयांच्या पाचवीलाच पूजलेला. दरवर्षी उन्हाळा जड जातो. सलग दोन वर्षांपासून पाऊस कमी झाला. यंदा नदी कधीही वाहिली नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने डिसेंबरमध्येच तळ गाठला. शिवारातील सगळ्याच विहिरी कोरडय़ाठाक. गावालगत ७०० मीटर अंतरावर हरिदास नाईकवाडी यांच्या मालकीची विहीर प्रशासनाने अधिग्रहित केली. पाणी उपलब्ध करून दिल्याच्या रुबाबात हात झटकले. विहिरीच्या काठावरून आत डोकावल्यावर डोळे गरगरतात. विहिरीत ६७ पायऱ्या उतरून डोक्यावर, खांद्यावर पाणी वर काढण्याचे जीवघेणे काम मागील दोन महिन्यांपासून येथले गावकरी दररोज करीत आहेत. कधी तोल जाऊन, कधी पाय घसरून अनेकजण विहिरीत पडले. आठ-दहा फूट पाणी असल्याने जिवाशी कोणी मुकले नाही. पुरुष कसेबसे हा प्रसंग हाताळतात. महिलांची व्यथा वेगळीच. कित्येकींना पोहता येत नाही. घरधनी मजुरीला गेल्यावर पाणी कोणी आणायचे? पाणी आणण्यासाठी घरी थांबल्यावर मजुरीचे काय, असा प्रश्न अनेक गावकऱ्यांचा चेहरा उपस्थित करतो.
मुक्ताबाई मुटकुळे (वय ६०) यांचा विहिरीतून पाणी घेऊन वर येताना पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या. आरडाओरडा झाला. जनावरांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या गणेश बेलदारे यांनी लगबगीने विहिरीत उडी घेतली. त्यामुळे बाका प्रसंग टळला. मुक्ताबाईंना पाण्याबाहेर काढणारे बेलदरे हेसुद्धा पाय घसरून विहिरीत पडले. मिलिंद बिडबाग, शिवाजी गरड यांनाही विहिरीत पडल्यामुळे दुखापत झाली. सरपंच मारुती बिडबाग यांची अवस्थाही वेगळी नाही. राखीव जागेवर बिनविरोध निवडून आलेले मारुतीरावसुद्धा पाय घसरून विहिरीत पडले. उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पाण्यासाठी जीवघेणी कसरत करताना राष्ट्रवादीचे सरपंच असलेल्या बिडबाग यांना कमरेत अपंगत्व आले. रोज एकजण का होईना विहिरीच्या तळाची ‘भेट’ घेऊनच वर येतो. सुबाबाई गांधले व शिवाजी सपकाळ या दोघांनीही साठी ओलांडली. दररोज पाण्यासाठी ६७ पायऱ्यांचा प्रवास ते दिवसातून किमान पाचवेळा करतात.
पाण्याबरोबरच पिकांची अवस्थाही दयनीय. राजकुमार बेलदारे यांना १० एकर जमीन. ते म्हणतात, ‘जेथे दोन हजार कडबा व्हायचा, तेथे यंदा वीस पाचुंदापण नाही.’ गावालगतच पांडुरंग करवर यांची शेती. शेतात विहीर, पण पाणी नाही. शिवारात ज्वारी, पण एकाही झाडाला कणीस नाही. सगळीकडे चिपाडे, कमरेइतकी. जनावरांच्या पाणी-चाऱ्याची अवस्थाही कमीच. विहिरीत उतरून कितीवेळा पाणी आणायचे? त्यामुळे जनावरांना तीनवेळा पाणी दाखविण्याऐवजी आता दोनच वेळा पाणी दाखवावे लागत असल्याचे लहू गरड यांनी हताश होत सांगितले.
जि. प. शाळेत खिचडी शिजविणाऱ्या महिलेला विहिरीतला ‘प्रवास’ अंगवळणी पडला आहे. विद्यार्थी शाळेत येताना घरूनच पाणी आणतात. खिचडीस लागणारे पाणी आणण्यासाठी मात्र विहिरीत उतरावेच लागते. गावातील प्रत्येक कुटुंबाला दिवसाकाठी किमान तीन वेळा तरी विहिरीचा फेरा पूर्ण करावाच लागतो. ज्यांची आर्थिक कुवत ठीक आहेत, ते ११ किलोमीटर अंतरावर उस्मानाबाद शहरातून खासगी टँकरने पाणी विकत घेतात. जनावरांमुळे दुधाचा व्यवसाय बरा आहे. बहुतेकजण दूध घेऊन दररोज उस्मानाबादमध्ये येतात. जाताना रिकाम्या दुधाच्या कॅनमध्ये पाणी नेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शहरापासून ११ किलोमीटर अंतरावरील पिंप्रीसारखीच अवस्था जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये आहे. विहिरीच्या पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी आता गढूळ झाले आहे. त्यामुळे तरी आता नवी समस्या निर्माण होऊ नये, याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेईल का?ज्यांना कोणीच नाही किंवा घरातले कर्ते कामावर गेले आहेत, अशा घरातील थकलेले हात काठी टेकत टेकत विहिरीकाठी येतात. विहिरीत चढ-उतार करून वैतागलेल्या कोणाला त्यांची दया आली तर एखादी कळशी किंवा हंडा पाणी काढून देतात. नियतीचा प्रहार असल्यामुळेच हिरवागार माळ करपून गेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या डोळ्यांतून उमटत होती.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत!
पाण्यासाठीची जिवावर बेतणारी लढाई हे चित्र सध्याच्या परिस्थितीत चांगलेच अस्वस्थ करून टाकत आहे. हवालदिल झालेले डोळे, थरथरत्या हातात पाण्याचा हंडा, ६० फूट खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी चाललेली जीवघेणी कसरत..
First published on: 14-02-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of struggle for one cauldron of water