कलावंत आणि दिग्दर्शकांची नावे वाचून आणि प्रोमोज् पाहून प्रेक्षक अनेकदा चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जातात. ‘असा मी अशी ती’ या चित्रपटातील कलावंत चांगले आहेत, त्यांनी अभिनयही उत्तम केला आहे, अप्रतिम छायालेखनाने  चित्रपट नेत्रसुखद झाला आहे, चित्रीकरण स्थळे उत्तम आहेत, सगळे काही चांगले आहे. पण कथा-पटकथा-दिग्दर्शन आणि संकलन या कमकुवत बाजू ठरल्याने चित्रपट अपेक्षित परिणाम साधण्यात कमी पडला आहे. लेखक-दिग्दर्शकांच्या ‘फॅण्टसी’च्या अट्टहासामुळे चित्रपट फसला आहे.
कलावंत चांगल्या चित्रपटांतून झळकले असले की अरे वा, अमुकतमुक कलावंत आहेत म्हणजे चित्रपट चांगलाच असणार असा एक ढोबळ अंदाज प्रेक्षक बांधतो. परंतु, हा अंदाज या चित्रपटापुरता चुकला आहे. सिद्धार्थ कामत हा यशस्वी तरुण करिअरमध्ये वेगवान प्रगती करतोय आणि त्याचबरोबर पत्नी रिया आणि मुलगा मिहीर असा त्याचा त्रिकोणी सुखी संसार सुरू आहे. अचानक रियाला कर्करोग होतो आणि तिचा मृत्यू होतो. त्यानंतर ऑफिसचे काम आणि मिहीरचे पालनपोषण करण्यात सिद्धार्थच्या आयुष्यातील काही कालावधी उलटून जातो. सिद्धार्थच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याला सांभाळून घेणारा, मिहीरची काळजी घेणारे सिद्धार्थचा मित्र नानू आणि त्याची बायको प्राजक्ता यांच्यासारखे मित्र सिद्धार्थला मिळतात. अचानक त्याच्या आयुष्यात अक्षरा येते. एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी ते एकत्र येतात. तत्पूर्वी एका रिअ‍ॅलिटी शोद्वारे तिला सिद्धार्थची प्रेमकहाणी आणि त्याच्या बायकोचा मृत्यू याबद्दल समजते. त्यामुळे ती सिद्धार्थवर प्रेम करू लागते. मिहीरलाही ती स्वीकारते. त्यामुळे पुन्हा लग्नाचा विचार करण्याचे सिद्धार्थ ठरवितो. पण सिद्धार्थ-अक्षरा यांना एकत्र न आणण्यासाठी शंभू महाराज नावाचा एक चित्रगुप्तासारखा परलोकातला इसम प्रयत्न करतो.
गोष्ट खरे म्हणजे साधी-सरळ-सोपी प्रेमकथा वाटावी अशी आहे. पहिल्या बायकोवरचे सिद्धार्थचे प्रेम ती गेल्यानंतरही कायम राहते, ते दाखविण्यासाठी दोन-तीन चांगल्या प्रसंगांची पेरणी दिग्दर्शकाने अतिशय चपखलपणे केली आहे. कालांतराने सिद्धार्थच्या आयुष्यात निर्माण झालेली स्त्रीची पोकळी भरून काढण्यासाठी अक्षरा चित्रचौकटीत येणे, सिद्धार्थ-अक्षरा यांचे प्रेम जुळणे हे सगळे अपेक्षितच म्हटले पाहिजे. परंतु, नियती, नशीब विरुद्ध माणसाचे कर्तृत्व अशी काहीशी संकल्पना लेखक-दिग्दर्शकांना मांडायची होती. त्यामुळे त्यांनी शंभू महाराज आणि त्याचे साथीदार यांना चित्रपटात आणले आहे. पुढे काय घडणार, आणि ते घडल्यानंतर हे विधिलिखितच होते अशी सर्वसामान्यपणे असलेली समजूत मोडीत काढण्याचा चंग लेखक-दिग्दर्शकांनी बांधला असावा. म्हणूनच अक्षरा-सिद्धार्थ यांना एकत्र न आणण्यासाठी ते प्रयत्न करतात असे दाखविले आहे. अतार्किक पातळीवर दिग्दर्शकाने चित्रपट नेला आहे. परंतु, त्यामुळे अपेक्षित परिणाम चित्रपट साधू शकत नाही.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेतील सचित पाटील, मानसी साळवी, पल्लवी सुभाष आणि बालकलाकार अथर्व बेडेकर यांनी आपल्या अभिनयाद्वारे त्या त्या व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत.  चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी पुढे काय होणार हेही प्रेक्षकाला सहजपणे समजते. परंतु, शंभू महाराज आणि त्याचे साथीदार जे काही करतात त्यामुळे चित्रपट पकड घेत नाहीच. उलट हास्यास्पद ठरतो. उत्तम छायालेखनामुळे चित्रपट नक्कीच ताजातवाना आणि नेत्रसुखद ठरतो. मध्यांतरापर्यंत चित्रपट लांबतो, कारण चित्रपटाला वेग नाही. परंतु, मध्यांतरानंतर भलत्याच पद्धतीने उलगडत गेल्यामुळे मध्यांतरापूर्वीपेक्षा एकदम वेगळ्याच पातळीवर जातो. अनेक ठिकाणी संकलित करायला संकलक विसरलेत की काय असे वाटते. नेत्रसुखद प्रेमकथापट असला तरी त्यामुळे विरस होतो.
श्री स्वामी समर्थ पिक्चर्स प्रस्तुत
असा मी अशी ती
निर्माती – उषा साळवी
दिग्दर्शक – अतुल कमलाकर काळे
कथा-पटकथा – सचित पाटील, अतुल काळे, आशीष रायकर
संवाद – सचिन दरेकर
संगीत – अमित राज
संकलन – अपूर्वा मोतीवाले, आशीष म्हात्रे
कलावंत – सचित पाटील, मानसी साळवी, पल्लवी सुभाष, अतुल काळे, शोमा आनंद, भरत दाभोळकर, विजू खोटे, आदेश बांदेकर, किशोर प्रधान, अनुजा साठे-गोखले, विवेक मेरे, लतिका गोरे, बालकलाकार अथर्व बेडेकर, बालकलाकार सायुरी हरळकर, अमोल घरत, नताशा तेंडुलकर.