उद्योगामध्ये असलेल्या वा नसलेल्या किंवा यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या वयवर्षे १८ ते ८२ पर्यंतच्या व्यक्तींसाठी ‘लोकसत्ता’ पुरस्कृत एक प्रेरणादायी कार्यक्रम रविवार, १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुलुंडच्या महाकवी कालिदास नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. परिवर्तन एक बदल, बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मैत्रेय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी उद्योजक होणारच’ हा कार्यक्रम होणार आहे.
उद्योग व उद्योजकांना प्रेरणादायी ठरेल असा हा कार्यक्रम असून यामध्ये नामांकित उद्योजकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या मार्गदर्शक वक्त्यांमध्ये निर्माण ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सावंत यांचे उद्योगाची ‘सुरुवात व वाढ’ या विषयावर तर बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट कुंदन गुरव यांचे ‘उद्योगधंदा का व कशासाठी?’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आहे. त्याचप्रमाणे पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचे ‘मार्केटिंग व ब्रॅण्डिग’ यावर तर ‘तळवलकर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर तळवलकर यांचे ‘बिझनेस फिटनेस’ या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे अग्रवाल क्लासेसचे डॉ. पवन अग्रवाल हे ‘वेळेचे व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई वृत्तपत्रविक्रेता संघाचे हरी पवार व सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष माधवराव भिडे यांनी केले आहे.  या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी संपर्क- अमित- ९८६७८१६०५९ , अनिष-  ९८६७९८३६०६.