यवतमाळ-वाशीम मतदारसंघात घोळ
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे राहणार, तसेच उमेदवारी कोणाला दिली जाणार, याबाबतचे कोणतेही संकेत दिल्लीतील काँग्रेस पक्षेश्रष्ठी आणि राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी न देऊन हा घोळ कायम ठेवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघ परंपरेने काँग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा सांगून दोन्ही पक्षांच्या अंतर्गत कलहाच्या आगीत तेल ओतले आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया,  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष नाना गाडबले यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांचे शिष्टमंडळ थेट शरद पवारांना भेटले असून जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची जी ताकत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त आहे तिचा दाखला देत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, असा आग्रह धरला आहे. या मतदारसंघात या पक्षाचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांना लढण्यास ‘सज्ज’ केले आहे. राष्ट्रवादीचा हा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सपशेल फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील िहगोली आणि कॉंग्रेसच्या ताब्यातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची अदलाबदल होणार असल्याची चर्चाही केवळ प्रसारमाध्यमांनी चालवलेली चर्चा आहे. पक्षासमोर असा कोणताच प्रस्ताव नाही, असे स्पष्ट प्रतिपादन लोकसत्ताशी या संदर्भात बोलताना ठाकरे यांनी केले. त्यांनी हेही सांगितले की, यवतमाळ मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील. कोणत्याही स्थितीत तो राष्ट्रवादीला दिला जाणार नाही. आघाडीत हा मतदारसंघ कुणाला सोडावा, या बाबत मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींमध्ये अजून निर्णय झाला नाही. शिवाय, उमेदवारी कुणाला मिळेल, याबाबतचे स्पष्ट संकेत मिळाले नसल्याने उत्सुक उमेदवारांमध्ये अजून प्रचाराची धामधूम सुरू झालेली दिसत नाही.
उमेदवारीसाठी स्वत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे प्रयत्नशील असून त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची त्यांची तयारी दिसते. त्यांचे जमले नाही तर मुलगा राहुल ठाकरे याला उमेदवारी मिळावी, असा ठाकरे समर्थकांचा प्रयत्न आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके हे आदिवासी नेते पक्षाने आदेश दिल्यास लढण्यास तयार आहेत. माजी खासदार  हरिभाऊ राठोड हे बंजारा समाजाचे नेते उमेदवारीसाठी जीवाची मुंबई-दिल्ली करीत आहेत. त्यांचे उपद्रवमूल्य लक्षात घेता त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेत पाठविण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींनी धुडकावल्यामुळे हरिभाऊ राठोड अस्वस्थ आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ऑल इंडिया बंजारा समाजाचे नेते डॉ. टी.सी. राठोड यांना प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती दिली आहे.
एकीकडे काँग्रेसमध्ये मतदारसंघ आणि उमेदवारीबद्दलचा घोळ कायम असतांना दुसरीकडे मात्र सेना-भाजप युतीच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीची हॅट्ट्रिक करून चौथ्यांदा लढण्याची जय्यत तयारी केली आहे. याचा अर्थ, मात्र सेना-भाजप युतीत सर्व काही ‘ऑल इज वेल’ आहे असे नाही. कारण, हा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी काही भाजप नेत्यांनी करून आम्हाला गृहित धरू नका, असा संदेश दिला आहे. मात्र, भाजपाच्या या मागणीने खासदार भावना गवळी अजिबात विचलित झालेल्या नाहीत. या मतदारसंघात सेनाच लढणार आणि उमेदवारी खासदार भावना गवळीनांच मिळणार, असा विश्वास सेना कार्यकत्रे व्यक्त करीत आहेत. खासदार भावना गवळींनी सुध्दा मतदारसंघ िपजणे सुरू केले आहेत. काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीतील काही नेत्यांना भेटून त्याचा मनोदयजाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अद्यापही मतदारसंघ अदलाबदलीची किंवा आघाडीत तो कोणाला सुटेल आणि उमेदवारी कोणाला मिळेल, याबद्दल फिर देखेंगे अशीच भूमिका घेतल्याने मतदारसंघातील कांॅग्रेस नेत्यांची गोची झाली आहे.