मतदान प्रक्रिया आटोपून परत आलेल्या मतदान अधिकाऱ्यांच्या पथकासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बसण्याची व्यवस्था न केल्याने हजारो कर्मचारी पहाटे चार वाजेपर्यंत पाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी रात्र उभ्याने जागून काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या सापत्न वागणुकीने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात गुरुवारी, १० एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हय़ाकरिता १९५० मतदान केंद्रावर तेवढेच केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. ५८५० मतदान अधिकारी होते. राजुरा विधानसभा मतदारसंघात ३५०, चंद्रपूर ३३६, बल्लारपूर ३४०, ब्रम्हपुरी ३१२, चिमूर ३०५ व वरोरा ३०७ मतदान केंद्र होते.  वणी व आर्णी येथे तेवढेच मतदान केंद्र उभारण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत दरवर्षी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असते. परंतु यावेळी मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजे एक तास वाढविण्यात आली होती. त्याचा परिणाम संपूर्ण आकडेवारी व मतदानाची टक्केवारी काढण्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना रात्री ९ वाजले. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरून तालुका पातळीवर व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यासाठी रात्री बारा ते एक वाजताला. जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिंपरी व पोंभूर्णा या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मतदान अधिकाऱ्यांना येथे पोहोचण्यास रात्रीचे एक ते दोन वाजले. रात्री उशिरा येणाऱ्या या केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला हवी होती. परंतु जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, सहायक निवडणूक अधिकारी दामोदर नान्हे यांनी तशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही.
मतदान केंद्रांवर या सर्व अधिकाऱ्यांना एक दिवस अगोदर म्हणजे ९ एप्रिल रोजी सोडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजतापासूनच सर्व मतदान केंद्र अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले. कुठलीही विश्रांती न घेता रात्री ८ वाजेपर्यंत हे सर्व अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त होते. त्यामुळे तालुका व जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया आटोपून परतणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची तसेच जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. नेमके याकडेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. रात्री उशिरा मतदान केंद्र अधिकाऱ्यांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले तेव्हा त्यांना बराच वेळ तिथेच ताटकळत उभे ठेवण्यात आले.
एकाच वेळी हजारो कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने या सर्वाकडून ईव्हीएम मशीन ताब्यात घेण्यासाठी बराच वेळ खर्ची झाला. त्यामुळे उपाशीपोटी असलेले अधिकारी व कर्मचारी सातत्याने तहसीलदार व संबंधीत अधिकाऱ्यांकडे पिण्याचे पाणी व जेवणाची मागणी करीत होते. परंतु तशी कुठलीही व्यवस्था येथे बघायला मिळाली नाही. विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडून कोटय़वधीचा निधी निवडडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी देण्यात आला होता. त्यातून मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. मात्र जिल्हा प्रशासनाने जाहीरातबाजी व अन्य कामांवर निधी खर्च करण्यास प्राधान्य दिले. त्या तुलनेत मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. सहायक निवडणूक अधिकारी दामोदर नान्हे यांना निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी नेमका निधी किती आला अशी विचारणा केली असता ही गोपनीय बाब असल्याचे कारण समोर करीत त्यांनी माहिती सांगण्यास नकार दिला.
जेव्हा की मतदान प्रक्रिया आटोपून परत येणाऱ्या केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाचे कंत्राट एखाद्या कॅटर्सला द्यायला हवे होते. परंतु प्रशासनाने परत येणाऱ्या पथकाला पहाटे चार वाजेपर्यंत उपाशीपोटी ताटकळत उभे ठेवले. याचा परिणाम हजारो अधिकरी व कर्मचारी जिल्हा प्रशासनाच्या या सापत्न वागणुकीवर कमालीचे संतापले आहेत. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्व अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात प्राधान्याने सहभागी झाले. परंतु प्रशासनानेच कर्मचाऱ्यांना अशाप्रकारची वागणूक देणे योग्य प्रकार नाही, असे आता कर्मचारी दबक्या आवाजात बोलून दाखवत आहेत.
यावेळी प्रथमच बचत साफल्य भवनाऐवजी नवीन जिल्हा उद्योग भवनात मततमोजणी होणार आहे. त्यामुळे १६ मे पर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक मशीन तिथेच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अव्यवस्थेचा फटका बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. आता हे सर्व कर्मचारी जिल्हा प्रशासनाच्या नावाने आरडाओरड करीत आहेत.