विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाच मिळेल असे संकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचे माजी खासदार गोविंदराव आदिक यांचा नगरसेवक अंजुम शेख यांनी नुकताच सत्कार आयोजित केला होता. त्या वेळी आमदार कांबळे, ससाणे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात ससाणे यांनी कांबळेंच्या उमेदवारीचे संकेत दिले. उर्दू हायस्कूलच्या बांधकामासाठी कांबळे यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे. तसेच पुढचा निधीही त्यांचा मिळेल. तो निधी मिळाला पाहिजे म्हणून कांबळे यांची भविष्यातील राजकीय जबाबदारी सर्वानी घ्यावी असे आवाहनही ससाणे यांनी या वेळी केले.
कांबळे यांच्या उमेदवारीची शिर्डी लोकसभा मतदारसंघातून चर्चा केली जात आहे. पण स्वत: कांबळे हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. त्यांचे नाव पक्षातीलच काही नेत्यांनी सुचवले आहे. पण त्यामागे पक्षांतर्गत राजकारण असल्याचे बोलले जात आहे. ससाणे यांच्या संकेतामुळे आता कांबळे हे विधानसभेचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेसाठी काँग्रेसकडून लहू कानडे, प्रेमानंद रूपवते व हेमंत ओगले यांची नावे चर्चेत आहेत. रूपवते यांचे नाव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, तर ओगले यांचे नाव माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी सुचवले आहे. कानडे यांनी शहरातील रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटीत तर ओगले यांनी मोरगेवस्तीवर घर घेतले आहे. मी बाहेरचा नाही हे दाखविण्यासाठी दोघांचा खटाटोप आहे. पण दोघांची मूळ निवासस्थाने मतदारसंघाबाहेर आहेत. आता कांबळे यांचे नाव मागे पडले असून कानडे व रूपवते यांच्या नावाची चर्चा आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.