उपराजधानीमधील नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये आणि कलावंतांमध्ये असलेले हेवेदावे आणि आपसातील वादामुळे नागपूरला अखिल भारतीय नाटय़ संमेलन अखेर होऊ शकले नाही. तरी किमान नागपूरच्या बाहेर बेळगावमध्ये होणाऱ्या संमेलनात  नागपूरच्या कलावंतांना संधी मिळावी, अशी अपेक्षा असताना एकाही कलावंताला आणि नाटय़ संस्थेला स्थान देण्यात आलेले नाही. नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये नियामक मंडळावर नागपूरचे चार सदस्य असूनही उपराजधानीवर ही वेळ यावी यासारखे दुर्देव नसल्याची प्रतिक्रिया नाटय़ वर्तुळात व्यक्त करीत अनेकांनी त्याचा निषेध केला.
नाटय़ संमेलनासाठी राज्यातील विविध नाटय़ शाखामधून प्रस्ताव मागितले असताना त्यात नागपूरचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यावेळी तरी उपराजधानीत संमेलन होईल, अशी अपेक्षा असताना नागपूर नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणी आणि कलावंतांमधील वादामुळे मध्यवर्ती शाखेने नागपूर शाखेचा प्रस्ताव बारगळला आणि बेळगावची निवड केली.
दरवर्षी होणाऱ्या नाटय़ संमेलनात नागपूरच्या कलावंतांना कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात संधी दिली जात होती. मात्र, नागपुरात अनेक चांगले कलावंत आणि संस्था असतानाही त्यांचा यावेळी विचार करण्यात आला नाही. नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत नागपूरमधून प्रमोद भुसारी, किशोर आयलवार, दिलीप देवरणकर आणि पराग लुले या कलावंतांचा समावेश आहे. त्यात प्रमोद भुसारी यांचे मध्यवर्ती शाखेत चांगले वजन असल्याचे बोलले जाते. मात्र, चारही सदस्य नागपूरच्या कलावंत व नाटय़संस्थांना संमेलनात स्थान मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. विदर्भातील अकरा जिल्ह्य़ामधून केवळ वाशीम जिल्ह्य़ातील मानोरा शाखेला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. मात्र, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील कलावंतांना आपली कला सादर करण्यास संधी देण्यात आली नाही.
६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्यामुळे किमान त्यांच्या उपस्थितीत किंवा संमेलनात नागपूरचा एखादा कार्यक्रम व्हावा, असे अपेक्षित असताना नाटय़ परिषदेने उपराजधानीला का टाळले, असा प्रश्न कलावंत उपस्थित करीत आहेत.
कोल्हापूर, पंढरपूर, बीड, पुणे मुंबई, डोंबीवली, मालवण यासह अन्य शहरातील नाटय़ परिषदेच्या शाखेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मात्र, उपराजधानीत कलावंत किंवा चांगल्या नाटय़ संस्था नव्हत्या का? असाही प्रश्न कलावंतांनी उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी नाटय़संमेलन नागपूरला होणार होते. त्यासाठी मध्यवर्ती शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली होती. मात्र, केवळ नागपूर शाखेतील कलावंतांच्या वादामुळे ते होऊ शकला नाही. त्यामुळे पंढरपूरला संधी मिळाली. यावेळी तरी नागपूरचा विचार होईल, असे वाटत असताना बेळगावला संधी मिळाली. अखिल भारतीय नाटय़ संमेलनासाठी कार्यक्रमाबाबत विविध शाखेतून प्रस्ताव मागितले जातात. मात्र, यावेळी कुठल्याही कार्यक्रमाचा प्रस्ताव मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आला नव्हता.
नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे असून गेल्या दोन महिन्यापासून नागपूर महापालिकेच्या नागपूर महोत्सवात व्यस्त असल्यामुळे परिषदेकडे त्यांना लक्ष देण्यास वेळ मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.  या संदर्भात मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळातील सदस्य दिलीप देवरणकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, नागपूरचे नियामक मंडळावर तीन सदस्य असून त्यात माझ्यासह प्रमोद भुसारी, किशोर आयलवार यांचा समावेश आहे. मात्र, ते नागपूरबाबत काहीच बोलले नाही. त्यामुळे नागपूरचा विचार करण्यात आला नाही. राज्यातील सर्वच नाटय़ शाखांमधून कार्यक्रमाबाबत प्रस्ताव मागविण्यात आले असताना नागपूर शाखेतून मात्र कुठलाच प्रस्ताव आला नसल्यामुळे शहराचा विचार करण्यात आला नसल्याचे देवरणकर यांनी सांगितले.