भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना-भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आहे. नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे शेकडो फलक शिवसेना-भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत अनधिकृतपणे लावले आहेत. त्यामुळे शहरांचे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात फलकांमुळे झाले होते, तशाच प्रकारचे विद्रूपीकरण आता झाल्याचे दिसत आहे.
 या फलकशाहीमुळे मोदी सत्तेत आल्याने ‘चांगले दिवस आले आहेत की शहरांचे वाईट दिवस आले आहेत,’ असा प्रश्न नागरिक खोचकपणे करीत आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाची ठिकाणे पालिकेने ठेकेदारी पद्धतीने ठेकेदाराला जाहिरात फलक लावण्यासाठी दिली आहेत. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या फलकावर तेथील जाहिरातींचा विचार न करता, ठेकेदाराची कोणतीही परवानगी न घेता नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे फलक लावले आहेत. याविषयी उघडपणे बोलले तर पक्षीय पदाधिकारी ‘दातओठ’ खातात. त्यामुळे दोन दिवस त्यांच्या जाहिराती सहन कराव्या लागतील, असे एका ठेकेदाराने सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वपक्षीय उमेदवारांनी कोणत्याही परवानग्या न घेता कल्याण-डोंबिवली परिसरात बेसुमार प्रचाराचे फलक लावले होते. या फलकबाजीची निवडणूक निरीक्षक आशीष अच्छानी यांनी गंभीर दखल घेतली. या फलकबाजीची झळ पालिका आयुक्त शंकर भिसे यांनाही बसली. निवडणूक काळात बहुतेक प्रचार फलक पालिकेकडून काढण्यात आले. शहर विद्रूपीकरणापासून वाचवले. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता हातात घेताच, शिवसेना-भाजपच्या पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, उठवळ कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता कल्याण, डोंबिवलीतील मुख्य रस्ते, गल्ली-बोळातील रस्ते, चौकांमध्ये नरेंद्र मोदी, शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे फलक शहरभर लावले आहेत. पालिकेत युतीची सत्ता आहे. त्यामुळे शहराचे किती विद्रूपीकरण करायचे याचे भान सत्ताधारी पक्षाने बाळगावे, अशी नागरिकांची मागणी आहे. पालिका आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या अनधिकृत फलकबाजीची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एका पालिका अधिकाऱ्याने विजयोत्सवाचे फलक लावण्यासाठी कोणीही आमच्याकडून परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.