नवी मुंबई पालिकेची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी एका मासिक सभेबरोबरच महिन्यातून दोन विशेष महासभा आयोजित करण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण मासिक सभेत विषय सोडून बोलणाऱ्या सदस्यांना मनसोक्त बोलता यावे यासाठी दिवसभराची ही महासभा घेतली जाणार असून अशा प्रकारे एका महिन्यात तीन महासभा घेणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिलीच पालिका ठरणार आहे. विशेष सभेचे आयोजन सभागृहातील आठ सदस्यांच्या मागणीनुसार घेण्याची तरतूद आहे.
नवी मुंबई पालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्याचबरोबर अनेक नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला हे भूषणावह नाही. त्यामुळे फेरीवाले, पार्किंग, अनधिकृत बांधकाम, वाढत्या झोपडय़ा, पाण्याची चोरी, निकृष्ट नागरी कामे, घनकचरा, डेब्रिज, भटक्या कुत्र्यांची दहशत यासारख्या विषयांवर नगरसेवक आवाज उठवीत आहेत. मात्र ही दखल घेताना विषयाला अनुसरून न घेता विषयापासून भरकटत जाऊन घेतली जात आहे. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांना मनसोक्त बोलता यावे यासाठी अर्थसंकल्पातील प्रत्येक शीर्षकानुसार ह्य़ा महासभा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यात सर्वप्रथम वाढते फेरीवाले, त्यांनी अडवलेले पदपथ, मार्जिनल स्पेसचा दुकानदारांनी मांडलेला बाजार या विषयावर लवकरच ही महासभा आयोजित केली जाणार आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत चालणाऱ्या विशेष सभेत सर्व सदस्यांना त्यांच्या प्रभागातील त्याच विषयावर बोलण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाला या समस्यांची दखल घ्यावी लागणार असून कार्यवाही आढाव्यासाठी सहा महिन्यानंतर त्याच विषयावर पुन्हा सभा आयोजित केली जाणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सूत्रधार माजी मंत्री गणेश नाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत या विशेष दोन महासभांचे सूतोवाच केले. एकाच सभेत अनेक विषयांचा घोळ घातला जात असल्याने अशा प्रकारची उपाययोजना केली जाणार असून त्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक विशेष सभेची मागणी नगरसचिवांकडे करणार आहेत. मागील सभेत विरोधकांच्या लक्षवेधी पटलावर घेण्यात आल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस नगरसेवक नाराज आहेत. त्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकच विरोधकाच्या भूमिकेत प्रशासनाला धारेवर धरत असल्याने या विशेष सभांचा विचार केला जात आहे. नगरसेवकांनी सभागृहात मांडणार असलेल्या समस्यांचा सखोल अभ्यास करताना त्याचे छायचित्र व छायाचित्रण सोबत घेऊन यावे असे अभिप्रेत आहे. ही समस्या मांडण्यापूर्वी प्रशासनाला त्याची तक्रार केली जावी असेही सुचविण्यात येणार आहे. नवी मुंबईत सध्या पार्किंग, फेरीवाले, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, डेब्रिज ह्य़ा समस्या महत्त्वाच्या आहेत. यात शहराची दैनंदिन साफसफाई हा विषय महत्त्वाचा होता, पण तो आता बऱ्यापैकी सोडविण्यात आला असल्याचे दिसून येते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मिशन महासभांना विरोधक कशा प्रकारे सहकार्य करतात ते येणारा काळ ठरविणार आहे.
’ स्थायी समितीतील टक्केवारीने राज्यात बदनाम झालेल्या नवी मुंबई पालिकेतील टक्केवारीला तूर्त लगाम लागल्याचे प्रमाणपत्र पालिकेत विरोधी बाकावर असलेले भाजपचे नगरसेवक रामचंद्र घरत यांनी दिले आहे. त्यामुळे पालिकेतील टक्केवारी शुद्धीकरणाला झालेली सुरुवात स्वागतार्ह असल्याची चर्चा सुरू असून यापूर्वी टक्केवारीच्या गाळात रुतलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. सभापती नेत्रा शिर्के यांनी मै नही खाती हूँ, और किसी को खाने नही देती हूँ असे जाहीर केल्याने टक्केवारीला तूर्त स्वल्पविराम बसला असल्याची चर्चा आहे.

सभागृह नेते जयवंत सुतार यांनी पालिकेचा लेखाजोखा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गतवर्षी अर्थसंकल्पाला मंजुरी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराची लक्तरे बाहेर पडणार आहेत. मोठे प्रकल्प व तीन निवडणुकीच्या तोंडावर करोडो रुपये खर्चाच्या कामांचा बार उडवून देण्यात आल्याने पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. तिला पूर्वपदावर आणण्याचे एकीकडे प्रयत्न केले जात असताना सभागृह नेत्यांनी प्रत्येक कामावर किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे याचा आढावा मागितला आहे. त्यामुळे विरोधकांचे काम सोपे होणार असून पालिकेची सद्यस्थिती स्पष्ट होणार आहे.

शहरातील नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर हातावेगळे करता यावेत यासाठी विशेष महासभांचा विचार सुरू असून तशी लेखी मागणी नगरसवेकांनी केल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाणार आहे. सर्व नगरसेवकांना आपले म्हणणे सविस्तर मांडता यावे आणि प्रशासनालाही त्यावर उपाययोजना करण्यास वाव मिळावा यासाठी विशेष महासभांचा विचार केला जात आहे.
सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई</p>