गेल्या ६० वर्षांचा उच्चांक तोडून यावर्षी अतिवृष्टी झाली. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रथम विदर्भातील नुकसानीचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन कळमेश्वर येथे आयोजित जनसंपर्क व आढआवा मेळाव्यात  गाज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी केले.
शरद पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ९२१ कोटीचे अनुदान पदरी पाडून घेतले. त्या अनुदानाचा पहिला हप्ता ६० टक्के वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या आठवडय़ात मिळणार असून ४० टक्के अनुदान येत्या हिवाळी अधिवेशनात ठराव पारित करून करण्यात येईल, तसेच राष्ट्रीय सुरक्षा योजनेचा प्रारंभ डिसेंबरपासून होणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना व अन्न सुरक्षा योजना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे, असेही याप्रसंगी सांगून १२ डिसेंबरच्या पवार यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहनही केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ग्रामीण अध्यक्ष बंडोपंत उमरकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, सूरज इटनकर, अविनाश गोतमारे, दीप्ती काळमेघ, धनराज देवके, अ‍ॅड. सागर कौटकर उपस्थित होते. प्रथम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामचंद्र काळे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. मेळाव्याचे संचालन प्रशांत निंबाळकर यांनी केले. तालुक्यात प्रथमच संपर्क दौरा होता. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अनिल देशमुख  यांनी जनहिताचे कार्यक्रम राबवावे, अशा मौलिक सूचना केल्या. देशातील सर्वात मोठय़ा कृषी मेळाव्याचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात नागपूर येथे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.