News Flash

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

संक्रांतीच्या पूर्वसंध्येला जुनी शुक्रवारी भागातील पतंग मांजा बाजारपेठमध्ये पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केल्याने त्या भागात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

| January 10, 2018 05:56 pm

संक्रांतीच्या पूर्वसंध्येला जुनी शुक्रवारी भागातील पतंग मांजा बाजारपेठमध्ये पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केल्याने त्या भागात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन नायलॉन मांजा विक्रेत्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांना सोडून देण्यात आले. जुनी शुक्रवारीमध्ये दोन पेटी नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला.
पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास थेट गजाआड व्हावे लागणार आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ अन्वये सक्त कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंह यांनी दिल्यानंतर संक्रांतीच्या एक दिवस आधी दुपारच्यावेळी जुन्या शुक्रवारी भागात दुपारी कोतवाली पोलिसांचे पथक पोहोचल्यावर त्यांनी काही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. दोन विक्रेत्यांना ताब्यात घेऊन माल जप्त केल्याची बातमी बाजारपेठेत कळताच सर्व विक्रेत्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे काही वेळ त्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘पोलीस चले जाव’ अशा घोषणा देत विक्रेते रस्त्यावर आले. काही विक्रेत्यांनी पोलिसांशी वाद घातल्यामुळे तणाव आणखी चिघळला. तणावाची परिस्थिती बघून पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तणाव वाढत असताना ताब्यात घेण्यात आलेल्या दोन विक्रेत्यांना सोडून देण्यात आले. मात्र, जप्त केलेला माल पोलीस घेऊन गेले.
उद्या संक्रांत असल्यामुळे जुनी शुक्रवारीसह शहरातील विविध भागात लोकांनी पतंग आणि मांजा खरेदीसाठी गर्दी केली होती. शुक्रवारी भागात पोलिसांची कारवाई सुरू असताना अनेक विक्रेत्यांनी नायलॉन मांजा लवपून ठेवल्याची माहिती मिळाली. गेल्या तीन-चार वर्षांपासून पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत आहे. मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. लाखो रुपयांची उलाढाल त्यात होते. नायलॉन धाग्यावर रासायनिक प्रक्रिया करून हा मांजा तयार केला जातो. तो सहसा तुटत नाही. त्याच्या वापरामुळे शरीराला गंभीर इजा होते. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होतात. मांजा गळ्यात अडकून दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना शहरात दरवर्षी घडतात. पक्षीही मोठय़ा प्रमाणात जखमी होतात. अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. नायलॉन मांजा तारांवर अडकल्याने त्यातून विजेचा प्रवाह आल्याने विजेचा धक्का लागल्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे मांजावर बंदी आणावी, अशी मागणी जोर धरू लागताच जुनी शुक्रवारी प्रमाणेच पोलिसांनी प्रतापनगर, गोपाळनगर, गोकुळपेठ, बर्डी, जागनाथ बुधवारी या भागात कारवाई करून मोठय़ा प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केल्याची माहिती मिळाली. यावेळी काही विक्रेत्यांनी सांगितले, येणारे ग्राहक आमच्याकडे नायलॉन मांजाची मागणी करतात. त्यामुळे त्यांना आम्हाला तो द्यावा लागतो. येथील विक्रेत्यांनी लाखो रुपये खर्च करून माल साठवून ठेवला आहे. जर तो जप्त केला जात असेल तर कारवाईला आम्ही विरोध करू, असेही विक्रेत्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 8:00 am

Web Title: no respite from nylon threat to birds even this sankranti
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 दफ्तरांच्या ओझ्य़ामुळे पाठीचा कणा कायमचा दुखावण्याचा धोका
2 विविध पदांवर वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
3 पोलीस आयुक्तांवर नव्या सरकारची मेहेरनजर
Just Now!
X