ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटद्वारे संचालित रामटेकचे योगिराज हॉस्पिटल आणि मौद्याच्या ‘एनटीपीसी’च्या संयुक्त विद्यमाने १२ गावांसाठी धन्वंतरी प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याचे उद्घाटन १२ एप्रिलला विभागीय आयुक्त बी.व्ही.जी. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सामाजिक दायित्व म्हणून एनटीपीसीने ही गावे दत्तक घेतली असून या गावांना योगीराज हॉस्पिटलमधून डॉक्टरांची चमू एक दिवसाआड भेट देऊन रुग्णांची तपासणी करणार आहे. रुग्णांना उपचार, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. दर महिन्यात महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येईल. रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन योगीराज हॉस्पिटलचे डॉ. दीपक डोंगरे यांनी केले आहे.
या प्रकल्पामध्ये कुंभारी, धामणगाव, रहाडी, इसापूर, मौदा, आंजनगाव, नवेगाव, बाबदेव, सावरगाव, खंडाळा, तरसा व हिवरा या गावांचा समावेश आहे. ही गावे तीन गटात विभागण्यात आली आहेत, असे एनटीपीसीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे व्यवस्थापक प्रशांत सिंग यांनी सांगितले.
 योगिराज हॉस्पिटल ना नफा ना तोटा तत्त्वावर सामाजिक दायित्व म्हणून चालवितो. ग्रामीण भागातील लोकांना योग्य उपचार व आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष उदयभास्कर नायर यांनी सांगितले.