पाऊस लांबल्याने खरीपाचा हंगाम किती प्रमाणात हाताशी येईल याविषयी कोणतीच हमी देता येत नाही. पाण्याचे स्त्रोत आटू लागले असून दोन-चार गावांचा अपवाद वगळता दिंडोरी तालुक्यात अद्याप पिण्याच्या पाण्याची फारशी झळ जाणवत नसली तरी पिकांसाठी मात्र पाणी नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाच गावाची तहान टँकरव्दारे भागविण्यात येत असून संभाव्य टंचाईच्या प्रश्नावर आ. धनराज महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत ४४ गावांच्या बंद पडलेल्या पाणी योजनांवर चर्चा करण्यात आली. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने १४ जुलै रोजी या विषयावर पुन्हा  चर्चा करण्यात येणार आहे. आढावा बैठकीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरविल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. खरिपाची पेरणीच न झाल्याने खरीपाचा हंगाम वाया गेल्याची भीती व्यक्त करत बँकांनी सक्तीची वसुली करू नये अशी चर्चा बैठकीत झाली.
सहा धरणांचा तालुका असलेल्या दिंडोरीत नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने दुष्काळी परिस्थितीतही पिण्याच्या पाण्याची फारशी झळ तालुक्यास जाणवत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश गावातील ग्रामस्थ गाव सोडून शेतात वास्तव्य करू लागले असून टंचाई न जाणवण्याचे हेही एक कारण असावे. चिकाडी, हनुमानवाडी, तळेगाव वणी, आशेवाडी, कोशिंबे ही गावे मात्र वर्षांनुवर्षांपासून टंचाईला तोंड देत आली आहेत. ओझरखेड, पुणेगाव, तीसगाव, वाघाड, करंजवण, पालखेड या धरणांनी तळ गाठला असला तरी पाण्याची अडचण सध्या तरी भासणार नसल्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाशिक दौऱ्यावर घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत दिंडोरी तालुक्यातील सध्याच्या पाणी, चारा आदी बाबतची माहिती पुस्तिका देण्यात आली होती. चिकाडी (गांडोळे), हनुमानवाडी (रडतोंडी), तळेगाव (वणी), कोल्हेरे, कोल्हेरे पाडा, टिटवे, वनारे (खुंटीचापाडा) या गावांमधील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील प्रमुख सात मंडळ मुख्यालयात जूनच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ५०.७९ टक्के पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी २२३ मिलिमीटर पाऊस याच काळात पडला होता. वार्षिक सरासरी ६९५.९० पर्जन्यमान असलेल्या दिंडोरी तालुक्यात ११४.२० मिलिमीटर पावसाची नोंद जूनपर्यंत झाली होती. मका, नागली, भात, वरई, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, बाजरी ही प्रमुख पिके असली तरी पावसाअभावी पेरणी होऊ शकलेली नाही. नागली, भात पाणीच नसल्याने त्यांची आवणी कशी करावी हा प्रश्न आहे. द्राक्ष पिकाला मात्र सध्याचे वातावरण पोषक आहे. टोमॅटोसह भाजीपाला पिकांनादेखील टंचाईचा फटका बसू लागला आहे.
पावसाअभावी पेरण्याच नसल्याने दुकानदारही हैराण झाले आहेत. बी-बियाणे, खतांच्या दुकानांकडे शेतकरी अजून फिरकण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील १२ लघुपाटबंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ातही पावसाने पाठ फिरविल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
बैठकीस आमदार आणि तहसीलदार यांच्यासह प्रांत मुकेश बोगे उपस्थित होते. ग्रामसेवकांचा संप असल्याने ग्रामीण भागातील परिस्थितीविषयी पुरेशी माहिती मिळू शकली नसली तरी तोंडी माहितीच्या आधारे इतिवृत्त तयार करण्यात आले. टंचाईसंदर्भात गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची सूचना तहसीलदारांना केल्यास त्यासंदर्भात त्वरीत निर्णय घेण्यात येईल असे बैठकीत सांगण्यात आले. बँकांनी वसुलीचे नियम शिथील करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.