धमक्यांना जुमानत नाही-मार्डचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे तिसऱ्या दिवशीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इंदिरा गांधी आणि महापालिका रुग्णालयांतील रुग्णसेवा कोलमडली. दोन्ही रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात रुग्णांची संख्या कमी झाली असून वार्डामध्ये रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने अनेक रुग्णांना सुटी दिली जात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या ‘अल्टिमेटम’ला घाबरत नसून हा संप सुरू राहणार असल्याचा इशारा मेयो आणि मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी दिला.
संपामुळे बाहेरगावावरून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून निवासी डॉक्टरांनी अधिष्ठात्यांचा विरोध झुगारून रुग्णालय परिसरात ‘ओपीडी’ सुरू केली. निवासी डॉक्टरांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या वॉर्डात आणि बाह्य़ रुग्ण विभागात सेवा देणारे मेयो रुग्णालयातील १३० तर मेडिकलमधील ३०० निवासी डॉक्टर्स संपावर गेल्याने आज रुग्णालयात शुकशुकाट होता. मेडिकलमध्ये दुपारच्यावेळी बाहेरगावावरून आकस्मिक विभागात अनेक रुग्ण उपचारासाठी आले असता त्यांना तपासण्यासाठी डॉक्टर उपस्थित नव्हते. परिचारिका आणि शिकाऊ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात असल्याचे दिसून आले. अनेक वार्डामध्ये रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ डॉक्टरांकडे आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी या संपामुळे  मेडिकलमध्ये ३ आणि मेयोमध्ये २ शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बाहेरगावावरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये अधिष्ठात्याच्या आदेशाला न जुमानता मेडिकल आणि मेयोमध्ये निवासी डॉक्टरांनी रुग्णासाठी कॅज्युएल्टीच्या बाहेर ओपीडी सुरू केली. दोन्ही शासकीय रुग्णालयात जिल्हा आरोग्य विभागासह ज्येष्ठ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली असली तरी अनेक वॉर्डात रुग्णांची गैरसोय झाली. या संपामुळे रुग्णसेवेवर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी केला. ओपीडीसाठी परावनागी नाकारली असताना त्यांनी ती सुरू केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. वाकोडे यांनी सांगितले.
या संदर्भात मार्डचे अध्यक्ष डॉ. पराग किंगे आणि डॉ. भूषण अंबादे यांनी सांगितले, मेडिकल आणि मेयोमधील शंभर टक्के निवासी डॉक्टर संपावर असून सर्वानी काम बंद आंदोलन पुकारले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी कामावर रुजू व्हा  अन्यथा कारवाई करू, अशी धमकी दिली असली तरी त्यांच्या दबावाला आता घाबरत नाही. वसतिगृह सोडण्याची नोटीस सर्व निवासी डॉक्टरांना देण्यात आली आहे मात्र, कोणीही वसतिगृह सोडणार नाही आणि केलेल्या कारवाईला आम्ही घाबरणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नााही तो पर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जानेवारी महिन्यात एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता मात्र त्यावेळी सरकारने दखल घेतली नाही. मार्च महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने मार्डच्या मागण्यांवर तीन आठवडय़ात निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे वैद्यकीय मंत्र्याच्या धमकीला न घाबरता संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. किंगे यांनी सांगितले.