स्वरातील सूक्ष्म फरक ओळखण्याची कानाची क्षमता किती आहे? एखाद्या गायकाची ही क्षमता वाढविता येते का? थोडक्यात कुठल्या गायकाला कुठल्या सप्तकातले गाणे जमेल या संगीताच्या अभ्यासकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा अनोखा प्रयत्न डोंबिवलीतील एका भौतिकशास्त्राच्या अभ्यासकाने केला आहे.
भौतिकशास्त्रातील ज्ञानाच्या आधारे डॉ. गोविंद केतकर यांनी विकसित केलेल्या या साधनेच्या मदतीने संगीताचा स्वरांक ओळखता येतो. तसेच, दमसास व आवाजाचा पल्ला किंवा पट्टी (रेंज) वाढविण्यास मदत होते, असे लक्षात आले आहे. टाटा मूलभूत संशोधन केंद्र (टीआयएफआर) आणि डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) येथे दीर्घकाळ संशोधन केल्यानंतर डॉ. केतकर यांनी पूर्णवेळ संगीत शास्त्रातील संशोधनाला वाहून घेतले. २००५ साली त्यांनी या विषयात पी.एच.डी.ही मिळविली. त्यांची पुस्तके संगीताच्या विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून चाळावी लागतात. आपल्या या अभ्यासातूनच डॉ. केतकर यांनी पुढे स्वरांक ही संकल्पना विकसित केली.
जगातील कोणत्याही संगीतासाठी ‘स्वरांक’ म्हणजे कानाची स्वरविभेदन शक्ती, दमसास आणि आवाजाची रेंज या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तीनही परिणामांची प्रगती मोजून निश्चित करण्याचा हा स्वरांक मोजण्याचे तंत्र डॉ. केतकर यांनी निर्माण केले.
तसेच तो सुधारण्यासाठी विशिष्ट साधनाही विकसित केली. या विशिष्ट साधनेमुळे दमसास आणि आवाजाची रेंज वाढण्यात मदत होते, असा डॉ. केतकर यांचा दावा आहे. डॉ. केतकर यांनी आपल्या संशोधनाचा प्रयोग मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर केला असता पाच दिवसांच्या प्रयत्नात या विद्यार्थ्यांचा सरासरी दमसास १० वरून १२ सेकंदावर गेला. तर आवाजाचा पल्ला हार्मोनियमच्या १५ पट्टय़ांवरून १८ पट्टय़ांवर गेल्याचे आढळून आले.
गंमत म्हणजे डॉ. केतकर यांना संगीताची आवड आहे. पण, ते त्यात विशारद नाहीत. म्हणजे आपल्या प्रयोगांनी एखाद्या गायकाची आवाजाची ‘रेंज’ किती आहे हे केतकर यांना सांगता येईल. पण, त्याचा आवाज कोणत्या प्रकारच्या गायकीसाठी योग्य आहे, हे मात्र डॉ. केतकर यांना सांगता येणार नाही. कारण, आपल्या अभ्यासाची बैठक ही भौतिकशास्त्राची असून आपली ‘गायकी’ ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांला गुरूचेच मार्गदर्शन घ्यावे लागेल,’ असे डॉ. केतकर सांगतात.
‘आवाजाचा पल्ला वाढविण्यासाठी या प्रकारच्या साधनेचा कितपत उपयोग होतो हे शेवटी व्यक्तिसापेक्ष असते. कारण, काहींना जन्मत:च संगीताची देणगी असते. त्यांना या प्रकारच्या साधनेचा उपयोग होणार नाही. पण, सराव आणि अभ्यासाने संगीत आत्मसात करू इच्छिणाऱ्यांना या साधनेचा उपयोग होऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया संगीत विभागाच्या प्रमुख मनिषा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
डॉ. केतकर यांच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन ब्राझीलच्या स्कूल ऑफ म्युझिकने या संशोधनावर आधारित लेख आपल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत.
लवकरच लखनऊच्या ‘भातखंडे इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक’ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातही डॉ. केतकर यांच्या साधनेची कार्यशाळा होणार आहे.
संपर्क – डॉ. गोविंद केतकर – ९८७०१५७३१४