प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज लवकरच नव्या प्रणालीद्वारे केले जाणार आहे. जुन्या प्रणालीद्वारे कामकाज ४ डिसेंबर २०१३ पर्यंत सुरु राहणार असून या प्रणालीवर वाहनाचे कोणत्याही कामकाजाचे शुल्क अथवा इतर प्रलंबित काम असल्यास त्याची त्वरित पूर्णता करावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी केले आहे. उपरोक्त मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा नवीन प्रणालीवरील कामकाज सुरू होईपर्यंत विचार केला जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व वाहनांशी संबंधित दैनंदिन कामकाज राष्ट्रीय सूचना केंद्राने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे केले जात आहे. परंतु, ही प्रणाली बरीच जुनी झाल्यामुळे या केंद्राने नवीन प्रणाली विकसित केली आहे. या नवीन वाहक संगणक प्रणालीवर परिवहन संवर्गातील वाहनांचे काम करण्यात येणार आहे. जुन्या टूल्स प्रणालीवरुन नवीन वाहन प्रणालीवर डेटा अपलोड करण्यासाठी जुन्या प्रणालीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जुनी प्रणालीचे कामकाज ४ डिसेंबपर्यंत सुरू ठेवले जाईल. त्यानंतर ही प्रणाली बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांचे जुन्या प्रणालीशी संबंधित कामकाज या मुदतीपूर्वी पूर्ण करुन घ्यावे.
या मुदतीनंतर आलेल्या अर्जाच्या नवीन प्रणालीवर कामकाज सुरू होईपर्यंत विचार केला जाणार नाही, असे बनसोड यांनी सांगितले. नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ५ ते १० डिसेंबर या कालावधीत रिक्षा, टॅक्सी, मालवाहू वाहने आणि बस आदी वाहनांची कामे बंद राहतील. त्यामुळे वाहनधारकांनी तत्पुर्वी आपली कामे करुन घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.