नागरी समस्या, वायुप्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली कल्याण- डोंबिवली शहरे आता धुलीकणाच्या वेढय़ात अडकत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरांच्या चोहोबाजूने जोमाने सुरू असलेली अधिकृत, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची संख्या तेवढीच वाहने मात्र दामदुप्पट. त्यामुळे  सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, उद्योग- व्यवसायातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषक घटकांमुळे कधी नव्हे इतके या दोन्ही शहरांच्या वातावरणात धुलीकण आणि हायड्रोकार्बनचे प्रमाण वाढल्याची माहिती पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात दिली आहे. या दोन्ही शहरांचे आरोग्य वाढत्या प्रदूषकांमुळे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रस्ते प्रदूषण
कल्याण-डोंबिवली शहर परिसरात सुमारे ३५० ते ४५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून दररोज सुमारे सव्वापाच लाख दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने ये-जा करतात. शहरात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्यांची लांबी तेवढीच असून वाहने मात्र तिपटीने वाढली आहेत. सततची वाहतूक कोंडी, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे शहरातील प्रदूषणात बेसुमार वाढ होत आहे. सीएनजीपेक्षा बहुतेक वाहने पेट्रोल, डिझेलचा सर्रास वापर करतात. सीएनजीमुळे प्रदूषण कमी होते. सीएनजीचे पंप नाहीत. भेसळीचे इंधन वाहनांमध्ये भरले जाते. आरटीओकडून नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे वाहन चालकांचे फावते. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात.

निवासी, औद्योगिक विभागाची घुसमट
औद्योगिक वसाहती आणि निवासी विभाग यामध्ये कोणतीही भौगोलिक सीमारेषा शिल्लक राहिलेली नाही. कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषक घटक निवासी भागातील स्वयंपाक घरात घुसत आहेत. उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाविषयी रहिवासी वाढत्या तक्रारी करीत असल्याने अनेक उद्योजक व्यवसाय बंद करण्याच्या किंवा स्थलांतराच्या मार्गावर आहेत. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोंबिवली एमआयडीसीत औद्योगिक वसाहती आणि निवासी वसाहती एकाच भूखंडावर असल्याने या भागातील नागरिकांना प्रदूषणाची समस्या अधिक भेडसावत आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सक्षमपणे काम करीत नसल्याने हा प्रश्न चिघळला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

गृहउद्योग
शहर परिसरात धनदांडग्या १५ ते २० विकासकांचे भव्य गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी लागणारी माती डोंगर फोडून, जमिनीत उत्खनन करून आणली जाते. गृहप्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी मिक्सर व अन्य अवजारांचा सुरू असलेला दणदणाट हवेत धुलीकणाचे लोट तयार करीत आहेत. कल्याणमधील आधारवाडी कचरा क्षेपणभूमीला नरकपुरीचे रूप आले आहे. तरंगत्या धुलीकणाबरोबर विविध प्रदूषित घटक या क्षेपणभूमीतून बाहेर पडत आहेत. ‘नॅशनल अ‍ॅब्रियंट एअर क्वॉलिटी’ प्रमाणानुसार वार्षिक सरासरी ६० मानांकापेक्षा जास्त आधारवाडी क्षेपणभूमी येथे धुलीकणाचे प्रमाण आढळून आले आहे. याशिवाय कल्याण रेल्वे स्थानक परिसर, शिवाजी चौक, ‘अ’ प्रभाग कार्यालय आंबिवली, शहाड जकात नाका, पालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय, भोईरवाडी वळण रस्ता येथे तरंगते धुलीकण व हायड्रोकार्बनचे प्रमाण मानांकापेक्षा अधिक आढळून आले असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. ७० टक्के वायूप्रदूषण वाहनांमुळे, २५ टक्के औद्योगिकीकरण आणि ५ टक्के इतर घटकांमुळे होते, असेही अहवालात म्हटले आहे.

प्रदूषणाचे विकार
हायड्रोकार्बन, धुलीकणांमुळे नागरिकांना हळूहळू श्वसनाचे विकार जडतात. डोळ्यांची जळजळ वाढते. धमन्यांच्या प्राणवायू वहन क्षमतेत शिथिलीकरण येते. फुप्फुसाचा दाह होतो. धुलीकण हा पाचव्या क्रमांकाचा मृत्यूस आमंत्रण देणारा घटक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

प्रदूषणावरील उपाय
अति रहदारीच्या ठिकाणी उड्डाण पूल उभारणे.
मालवाहू वाहने शहराबाहेर वाहनतळावर ठेऊन तेथून लहान वाहनाने मालाची ने-आण करणे.
वाहनांमध्ये सीएनजीचा वापर करणे.
पीयूसी व आयव्ही मानांची कठोर अंमलबजावणी करणे.
नवीन रस्त्यांची उभारणी करणे.
औद्योगिक व निवासी विभागातील सीमारेषा स्पष्ट करणे.
इंधन भेसळीला आळा घालणे.