नवी मुंबई शहरात पहिल्याच पावसाने रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे केले. शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे पालिकेच्या सभागृहात खडाजंगी उडाली होती. त्यानंतर आयुक्तांनी प्रशासनाला गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र आजही एमआयडीसी परिसर, दिघा, घणसोली, कोपरखरणे, वाशी, तुभ्रे नाका परिसरात भलेमोठे खड्डे आ वासून आहेत. खड्डय़ांचे अडथळे पार करीत आगमन झालेल्या बाप्पांना पुन्हा एकदा हे विघ्न पार करीत विसर्जन स्थळापर्यंत जावे लागणार असल्याने भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पावसापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण पालिकेकडून करण्यात आले. खड्डेमुक्त रस्ते असा कांगावा करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला. कामाचा दर्जा सुमार असल्याने नेहमीच्याच ठिकाणी असलेल्या खड्डय़ांनी त्यांची जागा कायम ठेवली होती. हे खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी खडय़ातच गेला म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरवर्षी लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात येते. यानंतर हेच अधिकारी खड्डे बुजविण्याच्या कामाचे सोपस्कार पार पाडतात. यातून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना मात्र लाभ होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. यंदादेखील महापालिकेच्या बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर चौफेर हल्ला चढवला होता. महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. यानंतर सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या डागडुजीची मोहीम हाती घेतली. अनेक ठिकाणी पावसातच खड्डे बुजविण्याचे काम उरकण्यात आल्याने त्यावर पाणी फेरले गेले. या खड्डय़ांतून बाप्पाचे आगमन झाले. गुरुवारी गौरी-गणपती विसर्जन असल्याने बाप्पांचा परतीचा प्रवासदेखील खड्डय़ांतून होणार आहे.

नवी मुंबई शहरात रस्त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. शहरातील खड्डे आगामी कालावधीत बुजविण्यात येतील. एमआयडीसी भागातील रस्त्यांचे डागडुजीकरण आणि एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प त्यातून सुरू असून त्यांचीदेखील पूर्तता होईल. शहरात इतर महानगरपालिकांपेक्षा फार तुरळक खड्डे आहेत.
मोहन डंगावकर, शहर अभियंता, महानगरपालिका