13 July 2020

News Flash

ऊसदरासंदर्भात ठोस कृती नसल्याने कराडात आंदोलनासाठी पुन्हा तयारी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराचा योग्य तोडगा काढण्यासाठी २४ नोव्हेंबपर्यंतची अंतिम मुदत दिली असताना, यासंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करणे, बैठक बोलावणे, समिती गठीत करणे अशी प्रक्रिया

| November 21, 2013 02:07 am

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराचा योग्य तोडगा काढण्यासाठी २४ नोव्हेंबपर्यंतची अंतिम मुदत दिली असताना, यासंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करणे, बैठक बोलावणे, समिती गठीत करणे अशी प्रक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अथवा संबंधित मंत्री, अधिका-यांकडून न झाल्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये असंतोष धुमसू लागला आहे. परिणामी, अंतिम मुदतीनंतरचे आंदोलनही मुख्यमंत्र्यांच्या कराडातच आक्रमकपणे छेडण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी सूचना केल्या असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगताना मुख्यमंत्र्यांच्या वेळकाढू धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वेळप्रसंगी ऊसउत्पादकांना न्याय मिळण्यासाठी कराड बंदची हाक दिली जाणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. तसेच शुक्रवारी (दि. २२) आंदोलकांच्यावतीने दुचाकी रॅली काढली जाणार आहे.
पंजाबराव पाटील म्हणाले, की राजू शेट्टी यांनी काल सोमवारी सकाळी कराड येथे आंदोलन करण्यासंदर्भात सूचना करताना येथील तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिकेस परवानगी मिळणेसंदर्भात निवेदन देण्यास सांगितले होते. येत्या रविवापर्यंत (दि. २४) ऊसदराबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्यास कराड येथे शेतक-यांचे भव्य ठिय्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी आम्हाला शेती उत्पन्न बाजार समितीचे आवार नको असून, कृष्णा घाट अथवा छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे ठिय्या आंदोलनासाठी आमची पसंती राहणार आहे. उद्या बुधवारी सायंकाळपर्यंत ऊसदरासंदर्भात निर्णय होईल अशी चर्चा सर्वत्र आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी अथवा संबंधितांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. त्यामुळे ऊसदराच्या निर्णयासंदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे, तर हंगामातील पुरता एक महिना वाया जात असल्याने ऊसउत्पादकांचे नुकसान होत असून, साखर उद्योगासमोरील अडचणीत भर पडत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या सभा उद्या बुधवारी (दि. २०) सायंकाळी सातारा तालुक्यातील अतीत व कटापूर येथे होत आहेत. या सभांना खासदार राजू शेट्टी हेही उपस्थित राहण्याची शक्यता असून, शेट्टींची आज कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, कोडोली येथे सभा होणार असल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाील ऊस उत्पादक शेतक-यांनी १५ नोव्हेंबरला कराडमध्ये आंदोलन छेडले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याची हमी दिली आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा न काढल्यामुळे २४ नोव्हेंबरपासून कराड येथे ठिय्या आंदोलन छेडले जाईल.
कराड येथे आंदोलनाला प्रारंभ करताच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांमार्फत येत्या चार दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याची हमी देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पण आजअखेर आमच्या संघटनेस बैठकीचे बोलावणे आलेले नाही. ऊसदराबाबत बैठक घेऊन तोडगा न काढल्यास खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ नोव्हेंबरपासून कराड येथे ठिय्या आंदोलन छेडले जाईल. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदराचे आंदोलन मोडण्यासाठी जाणीवपूर्वक गळितास सुरुवात केली आहे. शेतकरी त्यांना ऊस देण्यास तयार नसताना कामगारांवर दबाव आणून ऊस तोडण्यास भाग पाडले जात आहे. अशा कारखान्यांनी ऊसदराचे आंदोलन मिटेपर्यंत सुरू असलेली ऊसतोड व वाहतूक बंद करावी, अन्यथा शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावे लागले, असा इशारा पत्रकात दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2013 2:07 am

Web Title: preparing for the movement due to no concrete action to rate of sugarcane
Next Stories
1 वाळू तस्करी प्रकरणात शासकीय वाहनचालक निलंबित
2 विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सोलापूर विद्यापीठास ७ कोटी
3 ऊस दर आंदोलनाकडे दुर्लक्ष; शिवसेनेच्या वतीने श्राद्धविधी
Just Now!
X