दिवाळी अंकाची छपाई, युती, आघाडी फिस्कटल्याने अचानक वाढलेली उमेदवारांची संख्या, अपक्षांचे फुटलेले पेव, सहामाही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, या आणि अशा अनेक कारणांमुळे गेले काही दिवस मरगळ आलेल्या स्थानिक छपाईखान्यांना (पिंट्रिंग प्रेस) चांगले दिवस आले असून या छपाईखान्यांची धडधड २४ तास सुरू झाली आहे.
सोशल मीडियाच्या या जमान्यात निवडणूक काळात कागदावरील छपाईला पर्याय नाही. त्यामुळे उमेदवारांचे अहवाल, जाहीरनामे, पत्रके यांची सध्या सर्वत्र जोरात छपाई सुरू आहे. त्यात राज्यात युती, आघाडी तुटल्याने अचानक उमेदवारांची संख्या तिप्पट वाढली असल्याने या कुंभमेळ्यात अपक्ष उमेदवारांनीदेखील आपले नशीब अजमावण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राज्यात हजारो उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून काल परवा ध्यानीमनी नसलेला कार्यकर्ता आज उमेदवार म्हणून घोषित झाला आहे. सोशल मीडियावरील प्रचार हा मित्र मंडळीच्या वतीने फुकटात होत आहे पण घरोघरी द्यावे लागणारे कार्य अहवाल, जाहीरनामे आणि पत्रके यांच्यासाठी मर्जीतील पिंट्रिंग प्रेसशिवाय उमेदवाराला पर्याय नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी जवळच्या पिंट्रिंग प्रेसवाल्यांना गाठले असून दोन-तीन दिवसांत छपाई साहित्य देण्याचा आग्रह केला जात आहे. यात अगोदरच उमेदवारीची खात्री असलेल्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून अचानक बोहल्यावर चढलेल्या उमेदवारांची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. यात एका पिंट्रिंग प्रेसवाल्याकडे एकाच पक्षाचे काम असल्याची खात्री करून घेतली जात आहे.
जाहीरनाम्यातील आपली आश्वासने फुटू नयेत ही यामागची खबरदारी मानली जात आहे. त्यामुळे सर्वच प्रिंटिंग प्रेसवाल्यांना मुबलक काम उपलब्ध झाले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत असलेल्या हजारो प्रिंटिंग प्रेसनी या उमेदवारांकडून आगाऊ रक्कम घेऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिवसरात्र ऑपरेटर आणि प्रिंटिंग प्रेसवरील कामगार काम करीत आहेत. वेळेत काम करून देण्यासाठी दुप्पट-तिप्पट बिल लावले जात असून वाहत्या गंगेत हात धुवून घेतले जात आहेत. हा मेहनतीचा पैसा असल्याचे प्रिंटिंग प्रेसवाल्याचे मत आहे. निवडणुकीनंतर या राजकारणांकडे पैसे घेण्यासाठी चपला झिजवाव्या लागत असल्याने आगाऊ रक्कम घेतली जात असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका प्रिंटरने सांगितले. निवडणुकींच्या या हंगामात वर्षांनुवर्षे चालणाऱ्या दिवाळी अंकांचे प्रिंटिंगदेखील सुरू ठेवण्यात आले आहे. त्यात काही प्रिंटरना शाळांचे साहित्य छापण्याचे काम पूर्ण करावे लागत असल्याचे श्रद्धा ऑफसेटचे अमीर साळवी यांनी सांगितले. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा पिंट्रिंग प्रेसवाल्यांच्या छपाईखान्यांची धडधड सध्या दिवसरात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.