News Flash

नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज

या संदर्भात प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

| May 20, 2014 07:43 am

नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज

या संदर्भात प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आंबेडकर आणि गवई सोडले तर रिपब्लिकन पक्षाच्या नावाखाली उभे असलेले उमेदवार तथाकथित रिपब्लिकन चळवळीचे नव्हते. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम राबवून येणााऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले पाहिजे. मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून त्यातून सकारात्मक मुद्दे एकत्र आणून किमान समान कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात सर्व रिपब्लिकन पक्षाचे नेते एकत्र येतील, असा विश्वास असल्याचे कवाडे म्हणाले.
राम भाकरे, नागपूर
रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांवर पूर्वी सत्तेची समीकरणे जुळविली जात, यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत मात्र राज्यातील एकाही लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात रिपब्लिकन चळवळीचे अस्तित्व राहणार की जाणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर, अमरावती, अकोला, रामटेक, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांमध्ये भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजेंद्र गवई सोडले तर एकाही उमेदवाराला पाच हजारांचा टप्पा गाठता आला नाही. अमरावतीमधून माजी राज्यपाल अ‍ॅड. राजेंद्र गवई, खोरिपाचे रूपेश रामटेके, अकोल्यातून भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, चंद्रपूरमधून रोशन घायवन, बुलढाणामधून आंबेडकरी रिपब्लिकन पक्षाचे हिरामन गवई, नागपूरमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे घनश्याम फुसे आणि आंबेडकरी रिपब्लिकन पार्टीचे डॉ. प्रदीप नगराळे, रामटेकमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. सुनील नारनवरे, भारिपचे डॉ. संदीप नंदेश्वर आदी रिपब्लिकनच्या विविध गटातील उमेदवार निवडणुकीत रिंगणात असताना कोणालाही यश मिळाले नााही. गेल्या काही वर्षांत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष केवळ दलित मतांसाठी रिपब्लिकन पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात.  मात्र, सत्ता मिळाली की नेत्यांना विचारीत नाही, असा चळवळीतील नेत्यांनी आरोप आहे.
अ‍ॅड. राजेंद्र गवई गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. यावेळी त्यांना पुन्हा त्यांना उमेदवारी देतील, अशी आशा होती. मात्र, नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे गवई रिपब्लिकन पक्षाकडून निवडणुकीत उतरले आणि पराभूत झाले. गवई यांना केवळ ५४ हजार २२८ मते मिळाली असून त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. बुलढाणातून हिरामन गवई यांना ६ हजार ९८३, डॉ. घनश्याम फुसे यांना ६५५, डॉ. प्रदीप नगराळे यांना १ हजार ३६६, डॉ. सुनील नारनवरे यांना २ हजार ३१०, डॉ. संदीप नंदेश्वर यांना २ हजार ६४० मते मिळाली.
रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी सोडून महायुतीची कास धरल्यानंतर त्यांना जे हवे होते (राज्यसभा खासदार) ते त्यांनी मिळवून घेतले. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विशेष प्रभाव पडला नाही. महायुतीने रामदास आठवले यांच्या गटातील सुनील गायकवाड यांना सातारामध्ये उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव केला.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे आणि एकीकृत बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी यावेळी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा राज्यात विशेष प्रभाव पडला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 7:43 am

Web Title: question mark on rpi movement
टॅग : Nagpur,Rpi,Vidarbh
Next Stories
1 नवेगाव-नागझिरासाठी तज्ज्ञांची समिती
2 बोर अभयारण्याला हिरवा कंदील
3 आप, बसपसह ५१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
Just Now!
X