सेनगाव तालुक्यातील पळशी येथे रुख्मिणी विद्यालयात जमिनीत लपवून ठेवलेल्या पोषण आहारप्रकरणी तपासणी करताना अवैध केलेला वाळूसाठाही तहसीलदारांनी पकडला. याबाबत सव्वापाच लाख रुपये दंड आकारण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिशीवर मुख्याध्यापकांनी केलेला खुलासा तहसीलदार सारंग चव्हाण यांनी फेटाळला. त्यातच संस्थाचालकांनी दरेगाव शिवारातील पावत्या खुलाशासोबत जोडल्याने विद्यालयाच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
रुख्मिणी विद्यालयात पोषण आहारातील जमिनीखाली दडवून ठेवलेल्या तांदळाची पाहणी करण्यासाठी ३ जूनला तहसीलदार चव्हाण घटनास्थळी गेले असता त्यांना विद्यालयाच्या मैदानात ३५० ब्रास अवैध वाळूसाठा सापडला. हा अवैध साठा केल्याबद्दल चव्हाण यांनी संबंधित मुख्याध्यापकास ५ लाख २५ हजारांचा भरणा करण्याबाबत नोटीस बजावली. मुख्याध्यापकाने वाळूचा साठा केवळ ६५ ब्रास असल्याचे नमूद करून त्याची पावती व वाहन क्रमांक नमूद केले. परंतु मुख्याध्यापकाने केलेला सर्व खुलासा तहसीलदारांनी फेटाळला.