जातीवर आधारित आरक्षण रद्द करून खऱ्या वंचितांना आरक्षण दिले जावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले. शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारा आयोजित जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे उपस्थित होत्या. हृदय शल्यचिकित्सक डॉ. विजय सुरासे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर गोमारे आदी उपस्थित होते. जागतिकीकरणाचा रेटा वाढत आहे. जातीची बंधने गळून पडत आहेत. अजूनही आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना विरोध होतो, हे वास्तव आहे. खऱ्या अर्थाने राजकारणातून जातीचे निर्मूलन व्हावे, असे विचारवंतांना वाटते.
आरक्षण हा समाजकारणाचा कटकटीचा भाग बनला आहे. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण रद्द करून खऱ्या वंचितांना आरक्षण दिले जावे, असे सुराणा म्हणाले. प्रास्ताविक अनिरुद्ध जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुशीला पिंपळे यांनी केले.