परंपरागतरीत्या प्रसिध्दीपासून दूर राहण्यासाठी ख्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बदलत्या काळाची पावले ओळखत आता विविध प्रसारमाध्यमांमधून उमटणाऱ्या संघकार्याच्या चित्राबाबत विशेष काळजी घेणे सुरू केले आहे. नागपुरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने संघाच्या प्रचार विभागाने केलेल्या जय्यत तयारीवरून प्रसिध्दीसंदर्भात संघ ‘दक्ष’ होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये संघाशी संबंधित घटनांबाबत विविध माध्यमांमधून सातत्याने वार्ताकन होत असते. प्रारंभीच्या काळात माध्यमांमधून होणाऱ्या वार्ताकनावर वा चर्चांवर प्रतिक्रिया न देण्याची प्रथा संघाने पाळली होती. मात्र, माध्यमांचा जनमानसावरील वाढता प्रभाव लक्षात घेत देशभरातील सर्वात मोठी अशासकीय संघटना अशी बिरूदावली मिरवणाऱ्या या संघटनेनेही गेल्या काही वर्षांत माध्यमांवर लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे. संघाच्या अधिकृत प्रचार विभागाकडे माध्यमांशी संबंधित सर्व विषय हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली असून संघ पध्दतीने या विभागाचे जिल्हास्तरापर्यंत नियोजन करण्यात आले आहे. नागपुरातील प्रतिनिधी सभेतील वार्ताकन व प्रसिध्दीची जबाबदारी तसेच माध्यमांशी समन्वयाची जबाबदारीही याच प्रचार विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
दरवर्षी देशभरात विविध ठिकाणी आयोजित केली जाणारी प्रतिनिधी सभा तीन वर्षांच्या अंतराने संघाच्या मुख्यालयी नागपुरात होत असते. १३ ते १५ मार्चदरम्यान होत असलेल्या यंदाच्या प्रतिनिधी सभेसाठी विशेष पत्रकार कक्षाची निर्मिती स्मृती मंदिर परिसरात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नसल्याने दररोज संघाच्या वतीने या पत्रकार कक्षात संघाचे अधिकारी पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत.
 प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनाला पत्रकारांना परवानगी नसली तरी छायाचित्रकारांना काही काळ प्रवेश देण्यात आला होता.
पत्रकार परिषद तसेच प्रतिनिधी सभेत होणाऱ्या घडामोडींची अधिकृत माहिती देशभरातील माध्यमांपर्यंत पोहोचावी या करिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  संपूर्ण देशातील विविध वृत्तपत्रे व वाहिन्या यांना संघाच्या प्रचार विभागाच्या वतीने अधिकृत माहिती पुरविणारे इ-मेल दररोज करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, व्हॉटस् अ‍ॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिनिधी सभेची माहिती प्रसृत करण्यात येत आहे.
तसेच, संघाशी संबंधित फेसबुक पेजवरूनही आवश्यक ती माहिती प्रसिध्द करण्यात येणार आहे.
आपल्या कर्मठ कार्यपध्दतीकरिता रा.स्व.संघ ओळखला जातो. परंतु, संघटनेच्या बदलत्या गरजांनुसार जशी प्रसिध्दीव्यवस्था आली तशी नवी कार्यपध्दतीदेखील संघाने आत्मसात केली आहे. संघाशी संबंधित फेसबुक पेज किंवा संकेतस्थळांच्या माध्यमातून अनेक लोक संघाने जोडले आहेत. सोशल मीडियाद्वारे नव्या तरूणांना जोडण्याचे विशेष प्रयत्न संघाने जाणीवपूर्वक केले आहेत. अशा नव्या माध्यमातून जोडले गेलेले तरुण प्रतिनिधी सभा व्यवस्थेकरिता कार्यरत आहेत. प्रत्यक्ष संघात महिला नसल्या तरी विविध संघटनातून महिला कार्यरत आहेत. त्यामुळे प्रतिनिधी सभेतही महिलांचा सहभाग असणार आहे.

‘संघाची इच्छा असो किंवा नसो, माध्यमे संघाला प्रसिध्दी देत आहेत. आम्हाला संघाकरिता प्रसिध्दी नको मात्र देशातील चांगल्या कामांची प्रसिध्दी झाली पाहिजे. अशा प्रसिध्दीतून समाजात चांगली ऊर्जा निर्माण होते’ – दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह, रा.स्व.संघ