आळंदी रस्ता, नगर रस्त्यावर बीआरटी
जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी पुण्यात सुरू करण्यात आलेल्या बीआरटीचा दुसरा टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होत असून या टप्प्यात आळंदी रस्ता आणि नगर रस्ता या मार्गावर १६ किलोमीटर अंतरात बीआरटी धावणार आहे.
बीआरटीच्या दुसऱ्या टप्प्यात शहरात विविध मार्गावर बीआरटीचे नियोजन करण्यात आले असून या टप्प्यात ६८ किलोमीटर लांबीचे बीआरटी मार्ग तयार होणार आहेत. त्यातील काही मार्ग तयार झाले आहेत. त्यातील आळंदी रस्ता (सात किलोमीटर) आणि नगर रस्ता (नऊ किलोमीटर) या दोन मार्गावर १६ किलोमीटर अंतरातील बीआरटीची तयारी पूर्ण होत आली आहे. या मार्गावर एकूण २३ थांबे असतील. महापालिका हद्दीपर्यंत या गाडय़ा धावतील. बीआरटीबाबतच्या विचार-विनिमयासाठी नॅशनल सोसायटीज फॉर क्लीन सिटीज (एनएससीसी) या संस्थेची बैठक शनिवारी महापालिकेत बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी बीआरटीच्या दुसऱ्या टप्प्यासंबंधीची माहिती दिली.
स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर या प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटीचा पहिला टप्पा अपयशी ठरला असला आहे. तसेच सातारा रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलासाठी तेथे तयार करण्यात आलेला बीआरटीचा मार्गही आता उखडला जात आहे. या पाश्र्वभूमीवर बीआरटीचा दुसरा टप्पा सुरू होत असल्यामुळे त्याबाबत शंका घेतली जात आहे. मात्र, आधीच्या टप्प्यात आलेले अनुभव तसेच अहमदाबाद येथे सुरू असलेली बीआरटी व अन्य तांत्रिक बाबींचा विचार करून बीआरटीचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यातील १६ किलोमीटर अंतरात ८५ टक्के मार्ग हा फक्त बीआरटीसाठी तयार करण्यात आलेला असून उर्वरित मार्गावर मिश्र बीआरटी असेल. या मार्गावर ज्या गाडय़ा धावणार आहेत, त्या दोन्ही बाजूला दरवाजांची सुविधा असलेल्या गाडय़ा असून या गाडय़ांचा उजवीकडील दरवाजा बीआरटी मार्गावर उपयोगात आणला जाणार आहे.
मार्गावरील प्रमुख चौक, तसेच अन्य ठिकाणची सुरक्षितता, पदपथ, बसथांबे, ट्रॅफिक वॉर्डन, मशिनद्वारे तिकीट, गाडी सुरू असताना पुढील बसथांब्यांची माहिती देणारी यंत्रणा वगैरे सोयी-सुविधांचेही नियोजन सध्या केले जात असल्याचे खरवडकर यांनी सांगितले.
पुढील महिन्याच्या अखेरीस तयारी पूर्ण होऊन बीआरटीचा हा दुसरा टप्पा सुरू होईल, असेही ते म्हणाले. एनएससीसीचे सतीश खोत, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन, पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार, जनवाणीचे रणजित गाडगीळ आदींची या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.